आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भडगाव येथे आंब्याच्या झाडांची विनापरवाना कत्तल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भडगाव - एरंडोल रस्त्याला लागून असलेल्या शेतात विनापरवाना आंब्याची आठ ते नऊ मोठी झाडे तोडून वाहून नेणारा ट्रक वनविभागाने पकडला. गिरणा काठावरील आमराई नष्ट झाली असतानाच हा नवीन प्रकार पर्यावरणप्रेमींना चीड आणणारा आहे.
भडगाव तालुक्यातील प्रतिष्ठित मेहताबसिंग नाईक यांच्यासह आप्तेष्टांची मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे. त्यांच्या शेतात आंब्याची चांगली बाग होती. आंब्याच्या झाडांची सावली इतर पिकांना नुकसानदायी असल्याचा समज करून सर्व आंब्याची झाडे विनापरवानगी तोडण्याचा घाट शेतमालकाने घातला. एरंडोलच्या लाकूड व्यापार्‍यास सात लाखांत सर्व जिवंत आंब्याची झाडे विकून टाकण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून या भागात आंब्याच्या झाडांची तोड सुरू होती. इलेक्ट्रीक मशीन व कटरच्या साहाय्याने अवघ्या अर्धा तासात पन्नाशी गाठलेली झाडे तोडण्यात आली. वृक्षतोडीची तहसील व वन खात्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. विनापरवानगी वृक्षतोडीचा हा प्रकार प्रथमच समोर आला. वनविभागाने यातील ट्रक लाकडासह जप्त करून मोठी कारवाई केल्याचे धाडस दाखविल्याने त्यांचे पर्यावरणप्रेमी संघटनांनी कौतुक केले. शिवाय तालुक्यात इतर ठिकाणी होणारी वृक्षतोड थांबविण्याची मागणी आहे. आतापर्यंत तोडण्यात आलेला व जप्त केलेला माल सात लाख व ट्रक असा आहे.
गावरान कैरी स्वप्नच
भडगाव तालुक्याला गिरणा काठचे भाग्य लाभल्याने येथे आमराई फार मोठ्या प्रमाणात होती. मात्र, ती नष्ट झाल्याने ओळख पुसली गेली. आता नव्याने अशा प्रकारे आंब्याच्या झाडांची गैरसमजातून तोड होत असल्याने गावरान कैरी मिळणे कठीण झाले आहे. लोणच्यासाठी गावरान कैरीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, बाजारात गावरान कैरी मिळणे कठीण झाले आहे.
नियम पाळले जावेत
शेतकर्‍यास आपल्याच शेतातील भलीमोठी झाडे सहजासहजी तोडता येत नाही. यासाठी काही नियमावली आहे. मात्र, नियम पाळले जात नसल्याने आता शेतातच महाकाय झाडांची कत्तल होऊ लागली आहे. वनविभागानेही याकडे डोळेझाक केली आहे. दिवसाढवळ्या लाकडे वाहून नेणारे ट्रक, ट्रॅक्टर रस्त्यावर दिसतात मात्र याकडे पोलिस व वनविभाग दुर्लक्ष करतात.