आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manikrao Gavit News In Marathi, Lok Sabha Election, Nandurbar Lok Saba Seat

निवडणुकीचा आखाडा: माणिकराव गावित विक्रमाच्या उंबरठय़ावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार - नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सलग 9 वेळा निवडून आल्याचा विक्रम करणारे माणिकराव गावित आता दहाव्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी मिळवणारे देशातील पहिले ज्येष्ठ संसद सदस्य ठरले आहेत. यंदाही ते विजयी झाल्यास जगातील कोणत्याही लोकशाहीप्रधान देशात सलग 10 वेळा संसदेचे सदस्य म्हणून निवडून येण्याचा त्यांचा विश्वविक्रम असेल. त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ जगाच्या नकाशावर झळकण्याची शक्यता आहे.


1965 मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा करणार्‍या माणिकराव गावितांना केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री पदे न मागताच मिळाली. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले होते. 1981 साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. पहिल्या निवडणुकीत ते विजयी ठरले. त्यानंतर त्यांनी कधीच पराभव पाहिला नाही. 16 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. काँग्रेसच्या पहिल्याच यादीत माणिकराव गावित यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे दहाव्यांदा ते काँग्रेसतर्फे उमेदवारी करणार आहेत. जुनी दहावीचे शिक्षण घेतलेले माणिकराव गावित अजूनही तंदुरुस्त आहेत. ही त्यांची शेवटची टर्म असणार आहे. दरम्यान, मोदी लाटेत नंदुरबार मतदारसंघ हा भाजपाच्या ताब्यात जाण्याचा अंदाज एका सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. मात्र, माणिकराव गावित हे दहाव्यांदा विजयी होऊन विश्व विक्रम करतील, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.


यंदा कडवे आव्हान
यंदाची निवडणूक माणिकराव गावितांना कडवे आव्हान घेऊन आली आहे. कारण मित्र पक्षाचाच त्यांना अधिक धोका आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांनीही ही बाब भर मेळाव्यात निदर्शनास आणून दिली होती. यंदा त्यांचा पत्ता कट होणार की काय? अशी शंका उपस्थित होत होती. परंतु पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षर्शेष्ठींसमोर माणिकरावच कसे योग्य हे पटवून दिले. त्याचा परिपाक म्हणून माणिकरावांना शेवटची संधी देण्यात आली आहे. परंतु मतदार त्यांना शेवटची संधी देतात की नवापूरचा रस्ता दाखवतात हे निकालानंतर स्पष्ट होणारच आहे. माणिकरावांना आणखी संधी द्या, नंदुरबारचे नाव गिनिज बुकात जाऊ द्या, असे भावनिक आवाहन काँग्रेसचे नेते करणार आहेत. प्रचारातील हाच ठळक मुद्दा असणार आहे. पान खाणारे खासदार, गाडीला हात दिला तर गाडी थांबवणारे खासदार व दांडगा जनसंपर्क असणारा नेता म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांच्यावर कुठल्याही गैरप्रकाराचा आरोप नाही. त्यामुळे माणिकरावा गावित यांच्या विरोधात भाजपालाही तगडा उमेदवार देण्यावाचून गत्यंतर नाही.


सईदांशी बरोबरी..
लक्षद्वीपचे खासदार पी.एम.सईद हे तब्बल 10 वेळा विजयी ठरले आहेत. 1967 मध्ये ते अपक्ष निवडून आले होते.त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर ते 9 वेळा सलग निवडून आले आहेत. त्यांचे 10 डिसेंबर 2005मध्ये निधन झाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे 10 वेळा निवडून आले आहेत.परंतु आधीच्या पक्षाचे नाव भारतीय जनसंघ होते. त्यानंतर ते भाजपच्या तिकिटावर निवडून येत होते. त्यांच्या निवडून येण्यात खंड पडला आहे.
बंगालचे मार्क्‍सवादी कम्युनिष्ट पक्षाचे सोमनाथ चटर्जी हे तब्बल 9 वेळा निवडून आले आहेत.परंतु 1984 मध्ये ममता बॅनर्जी यांनी जादवपुरी या लोकसभा मतदारसंघात त्यांचा पराभव केला होता.त्यानंतर ते पुन्हा एकदा निवडून आले होते. 10 वेळा निवडून येण्याचा विक्रम केला असला तरी पराभवाची झळ त्यांना बसली आहे. तथापि, नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित हे एकाच मतदारसंघात एकाच पक्षातर्फे सलग नऊ वेळा निवडून आल्याने त्यांनी पी.एम. सईद यांची बरोबरी केली आहे. आता ते दहाव्यांदा निवडून आल्यास त्यांचा विश्व विक्रम होऊ शकेल,असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.