आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manish Jain Planing To Give Up Congress Membership

मनीष जैन यांचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’ नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कोट्यवधी रुपये खर्चाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले मनीष जैन काँग्रेस पक्षाचं ‘कुंकू’ लावून घ्यायला उत्सुक असले तरी कायद्यातील तरतुदीमुळे त्यांना केवळ काँग्रेसचे ‘सहयोगी आमदार’ (सदस्य नव्हे) म्हणूनच मिरवता येणार आहे. मात्र, जळगाव शहरातील राष्ट्रवादीसह खान्देश विकास आघाडीच्या काही नगरसेवकांना काँग्रेसच्या व्यासपीठावर आणून जिल्ह्यातील राजकीय विश्वाला धक्का देण्याचे नियोजन केले जाते आहे.


येत्या 20 एप्रिल रोजी जळगावात आमदार मनीष जैन यांच्या पुढाकाराने कापूस परिषद होत आहे. या परिषदेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अथवा प्रदेश काँग्रेसकडून त्या वृत्ताला अजून दुजोरा मिळालेला नाही. मात्र, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह काँग्रेसचे राज्याचे काही मंत्री या परिषदेला उपस्थित राहातील. याच परिषदेत मनीष जैन यापुढे काँग्रेसबरोबर राहाण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थात, या घोषणेला वैधानिक पातळीवर महत्त्व नसेल. विधान परिषदेत त्यांचे अस्तित्व अपक्ष आमदारच राहील. त्यामुळे काँग्रेसचे सहयोगी आमदार हे केवळ उल्लेखापुरतेच राहील.


सालारांकडे महत्त्वाची जबाबदारी?
करीम सालार यांना काँग्रेस पक्षात आणल्यास त्यांना महत्त्वाचे पद देण्याचेही काँग्रेस र्शेष्ठींनी मान्य केल्याचे संकेत मिळाले आहेत. प्रदेश पातळीवरूनच या हालचाली सुरू आहेत.


घटनेत तरतूद हवी
अपक्ष आमदाराला एखाद्या पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारायचे असेल तर तशा सदस्यत्वाची तरतूद त्या पक्षाच्या घटनेत असायला हवी, अशी दुरुस्ती पक्षांतरबंदी कायद्यात केली आहे. काँग्रेसच्या घटनेत अशी तरतूद नसल्यामुळे मनीष जैन यांना काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व मिळू शकणार नाही.


नगरसेवकांवर भागवणार
मनीष जैन जरी काँग्रेसमध्ये जाऊ शकत नसले तरी शहरातील राष्ट्रवादीचे आणि खान्देश विकास आघाडीतील काही नगरसेवक त्या दिवशी कापूस परिषदेच्या या व्यासपीठावर असतील, अशी शक्यता आहे. त्यात करीम सालार यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक खासदार ईश्वर जैन यांचे सर्मथक आहेत. त्यामुळे ते मनीष जैन यांच्यासमवेत कापूस परिषदेच्या, अर्थात, काँग्रेसच्या व्यासपीठावर असतील, अशी शक्यता आहे. करीम सालार हे आमदार सुरेश जैन यांचे खंदे सर्मथक असून स्वत: आमदार मनीष जैन हे सुरेश जैन यांचे मानसपुत्र म्हणवले जातात.


मी काँग्रेस विचारांचाच
मी मुळात काँग्रेस विचारांचाच माणूस आहे. मला आवडणारा हा पक्ष आहे. आज तरी मी कोणत्याच पक्षात नाही. आमदार सुरेशदादांवरच्या प्रेमामुळे मी त्यांच्यासोबत आहे. काँग्रेसमध्ये जायचे असेल तर मित्र आणि परिवारातील सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेईन. करीम सालार, नगरसेवक