आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मंथन’च्या परीक्षेत गोंधळ; इंग्रजीऐवजी दिल्या मराठी प्रश्नपत्रिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत रविवारी गणित आणि समाजशास्त्र या विषयाच्या पेपरला सेमी इंग्रजी माध्यमाच्या काही विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. गोंधळातच परीक्षा झाल्याची घोषणा करीत आयोजकांनी पालकांशी हुज्जत घालत परीक्षा केंद्र सोडले.

अहमदनगर येथील मंथन पब्लिकेशनतर्फे घेण्यात येणारी प्रज्ञाशोध परीक्षा रविवारी शहरातील खुबचंद सागरमल विद्यालयात पार पडली. दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. तीन वेगवेगळ्या सत्रात ही परीक्षा झाली. दुसर्‍या सत्रात गणित आणि समाजशास्त्र या विषयाच्या पेपरला सेमी इंग्रजी माध्यमाच्या काही विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. मात्र, ही चूक विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर बदल करण्याच्या प्रक्रियेसाठी किमान 20 मिनिटे लागली. या परीक्षेसाठी प्रतिविद्यार्थी 370 रुपये परीक्षा फी घेण्यात येते. तसेच शिकवणीसाठी विद्यार्थ्यांना 2500 ते 3000 हजार रुपये खर्च आला. तो खर्च या प्रकारामुळे वाया जाईल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील तीन केंद्रांवर ही परीक्षा झाली. यात जळगाव येथे 717, भुसावळ 166 आणि चाळीसगाव केंद्रावर 175 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

त्यांची चूक असतानाही आयोजकांनी पालकांशी हुज्जत घातली. त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. पेपर पुन्हा घेतला पाहिजे. -किशोर झोपे, पालक

सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका एकत्रित ठेवलेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या होत्या. मात्र, तत्काळ सुधारणा करण्यात आली. पालकांनी आक्रमक भूमिका घेतली.
-भरत पाटील, केंद्र समन्वयक, मंथन

गणित आणि समाजशास्त्र विषयाचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी बाहेर पडताच गोंधळ झाल्याचे सांगितले. आयोजकांनी हा पेपर पुन्हा घेतला पाहिजे. - - सरला पाटील, पालक