आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता दरबारात पडला तक्रार अर्जांचा पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेने सुरू केलेल्या जनता दरबाराला वाढता प्रतिसाद आहे. मंगळवारी तिस-या जनता दरबारातसुद्धा शहरवासीयांच्या तक्रारींचा पाऊस पडला. रस्ते, पाणी, गटारी, पथदिव्यांसारख्या पायाभूत सुविधा मिळाव्यात त्या अनुषंगाने अनेक रहिवासी पोटतिडकीने उपनगराध्यक्ष विजय चौधरी यांच्याकडे तक्रारी मांडत होते.

पालिकेतील दैनंदिन कामकाजाचे नियोजन विस्कळीत झाल्याने शहरवासीयांनी समस्या मांडाव्यात कुणाकडे? असा प्रश्न आहे. पालिकेत तक्रार घेऊन गेल्यावर कर्मचारी जागेवर भेटत नसल्याने नागरिकांना निराशेने परतावे लागायचे. हा मुद्दा हेरून उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यावर विजय चौधरींनी जनता दरबाराचा उपक्रम सुरू केला. त्यामुळे नागरिकांना तक्रारी मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. मंगळवारी झालेल्या जनता दरबारात तब्बल 90 तक्रारी प्राप्त झाल्या. सर्वाधिक तक्रारी बंद पथदिवे, अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, बंद पाणीपुरवठा, रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत होत्या. अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन चौधरी यांनी हॉस्पिटलजवळ अतिक्रमण करून बांधलेल्या भिंतीची तक्रार केली. चौधरींनी प्राप्त तक्रारींनुसार संबंधित पालिका कर्मचा-यांना बोलावून दोन दिवसांत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तक्रारींचे निराकरण झाल्यावर त्याची माहिती अथवा सद्य:स्थितीचा आढावा एसएमएसद्वारे कळवण्याची सूचना कर्मचा-यांना केली.
पंचशीलनगरातील तक्रारी
पंचशीलनगरातील शौचालयाची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांची मोठीच गैरसोय होत आहे. ही अडचण सोडवण्यासह मुख्य रस्ता ते बुद्ध विहारापर्यंत शेवटच्या रस्त्यापर्यंत डांबरीकरण करावे, अशी मागणी मुन्ना सोनवणे यांनी केली. परिसरातील नागरिकांसह ते पालिकेत आले होते.