आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूकमाेर्चासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले; अन्यायाविरुद्ध एल्गार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अन्याया विरुद्धलढा देण्याचा एल्गार करीत सर्वपक्षीय मराठा राजकीय नेते एकवटले. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सगळ्यांनी एकदिलाने मूकमाेर्चा पार पाडण्याची तयारी दर्शविली. यामध्ये राष्ट्रवादीचे राजवर्धन कदमबांडे, संदीप बेडसे, मनाेज माेरे, किरण शिंदे यांच्यासह काॅंग्रेसचे कुणाल पाटील, श्यामकांत सनेर, ज्ञानेश्वर भामरे यांच्यासह भाजप शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनीही एकजूट दाखवत अन्यायाविरुद्ध वज्रमूठ आवळली.
शहरात २८ सप्टेंबरला मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. त्याची तयारी वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी केशरानंद गार्डनमध्ये बैठक झाली. या वेळी मोर्चाचा मार्ग, पार्किंग व्यवस्था, स्वयंसेवकांचे पथक, मोर्चाची आदर्श आचारसंहिता यासह इतर विषयांवर चर्चा झाली. माेर्चासाठी काही जणांनी स्वयंस्फूर्तीने देणगी दिली. काही जणांनी वाहनांची व्यवस्था करणार असल्याचे जाहीर केले. बाहेरगावांहून येणाऱ्या समाजबांधवांसाठी अल्पोपाहार, त्यासाठी आवश्यक साहित्य जागा देण्याची तयारी काहींनी दर्शवली. अत्याचाराच्या विरोधात निघणाऱ्या मूकमोर्चाला पाठिंबा जाहीर करणाऱ्या इतर समाजबांधवांचे कौतुक करण्यात आले. या वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, अामदार कुणाल पाटील, शरद पाटील, रामकृष्ण पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, मनोज मोरे, श्यामकांत सनेर, अतुल सोनवणे, संदीप बेडसे, संदीप पाटोळे, सदाशिव पवार, प्रफुल्ल पाटील, अरविंद जाधव, म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे,मूकमाेर्चासाठी सर्वपक्षीय नेते किरण पाटील, कमलेश देवरे, संजय बोरसे, प्रा. अडसूळ, राम भदाणे, श्यामसुंदर पाटील, अमोल मराठे, रविराज भामरे, प्रमोद सिसोदे, हेमंत साळुंके, अॅड. राहुल पाटील, डॉ. संजय पाटील, भानुदास बगदे, लहू पाटील, साहेबराव देसाई आदी उपस्थित होते. क्रांती मोर्चा आणि एकजुटीबद्दल निर्धार केल्यानंतर प्रत्येकाने हात उंचावून ‘बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा एकमुखाने नारा देऊन बैठकीचा समाराेप केला.

स्वच्छता समितीत दिग्गज
मूकमोर्चात लाखोंच्या संख्येने समाजबांधव एकवटणार आहेत. मोर्चासाठी विविध समित्यांमार्फत काम करण्यासाठी अनेक समाजबांधवांनी आपली तयारी दर्शविली आहे. यातील स्वच्छता समितीमध्ये तर महाविद्यालयीन तरुण, नगरसेवक, मल्ल, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शिक्षक, शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी यांनी आपली नावे नोंदविली आहेत.

‘एकदिलाने राहू कायम...’
केवळ २८ सप्टेंबरच्या मोर्चासाठीच नव्हे, तर यानंतरही सर्व समाजबांधवांनी एकजूट एकदिलाने राहावे. एकजुटीमुळे इतर प्रश्नांनाही वाचा फोडता येते. त्यामुळे संघटित राहण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. तसेच समाजातील विविध प्रश्न, समस्या आणि विकासासाठी पुढे येण्याची तयारी प्रत्येकाने ठेवावी. तरच आराध्यदैवत राजमाता जिजाऊ, शिवराय यांना अभिप्रेत असलेला समाज महाराष्ट्र उभा करता येईल, असे विचार मांडण्यात आले. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

काेणताही निर्णय झालेला नाही
^शहरातदाेन माेर्चे एकाच दिवशी काढले गेले, तर कायदा-सुव्यवस्था धाेक्यात येऊ शकते. त्यामुळे शिष्टमंडळाला काेणताही निर्णय दिलेला नाही. कोणतेच अाश्वासनही दिलेले नाही. -दिलीपपांढरपट्टे, जिल्हाधिकारी

हजार झेंडे वेधणार लक्ष
मूकमोर्चाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे हजार झेंडे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये अर्धा, पाऊण एक मीटरच्या हजार भगव्या ध्वजांचा समावेश आहे. याशिवाय कोपर्डी घटनेच्या निषेधासाठी एक हजार काळे झेंडे तयार करण्यात आले आहेत. निषेध दर्शविण्यासाठी सुमारे अडीच हजार काळे टी-शर्टही तयार करण्यात आले. याशिवाय ५०० रिक्षांमागे बॅनर लावून जनजागृती केली जाते आहे.
दलित समाज प्रतिमोर्चा; निर्णय अद्याप अधांतरी
शहरात २८ सप्टेंबरला हाेणाऱ्या मूकमाेर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रतिमाेर्चा काढण्यावर दलित संघटना कायम अाहेत. त्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी तसेच पाेलिस अधीक्षकांसाेबत शिष्टमंडळाची बैठक झाली. मात्र, यात काेणताही निर्णय झाला नाही. २८ सप्टेंबरपूर्वी अथवा त्यानंतर परवानगी देऊ, असे मत प्रशासनातर्फे मांडण्यात अाले. मात्र, त्यातून समाधानकारक ताेडगा निघाला नाही. सायंकाळी पुन्हा बैठक हाेईल, असे सांगण्यात अाले. मात्र, काेणताही निर्णय झालेला नाही, असे जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.
प्रतिमाेर्चाला २८ सप्टेंबरलाच परवानगी द्यावी, अशी मागणी दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यासाठी गुरुवारी तरुणाच्या मृत्यूवरून ठिय्याही देण्यात अाला. त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसाेबत या संघटनांच्या पाच प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला पुन्हा पाेलिस शिपायांचा वेढा देण्यात अाला हाेता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर पाेलिस तैनात करण्यात अाले हाेते. सकाळी ११.३० वाजता शिष्टमंडळाची बैठक सुरू झाली. शिष्टमंडळात एम.जी.धिवरे, बाबा हातेकर, राहुल वाघ, भिवसन अहिरे, सिद्धार्थ बोरसे, अंकुश सोनवणे यांचा समावेश हाेता. एक तास बैठक चालली. मात्र, काेणताही निर्णय झाला नाही, असे शिष्टमंडळाच्या सदस्यांनी बैठकीतून बाहेर अाल्यावर सांगितले. ते म्हणाले की, २८ सप्टेंबर रोजी प्रतिमोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली; पण एकाच दिवशी दोन वेगवेगळे मोर्चे निघाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याने दोन्ही मोर्चांना एकाच वेळी मंजुरी देता येणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली.

प्रशासनाला जर प्रतिमोर्चासाठी परवानगी देण्यात येत नसेल, तर मराठा क्रांती मूकमोर्चालाही परवानगी देण्यात येऊ नये, अशीही मागणी केली; परंतु त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे निर्णय हाेत नाही ताेपर्यंत प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे या वेळी सांगण्यात अाले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दलित संघटनांच्या प्रतिनिधींसह माेठा जमाव जमला हाेता.
बातम्या आणखी आहेत...