आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समाजकारण: भुसावळात मराठा समाजाच्या जागेचा विषय ऐरणीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- भुसावळ नगरपालिकेने 1993 ते 2013 या कालावधीत 90 नोंदणीकृत संस्थांना 12 लाख 85 हजार चौरस फूट जागा नाममात्र भाडेकरारावर दिली आहे. मात्र, मराठा समाज भुसावळ या संस्थेला चार वर्षांपूर्वी जागा देण्याचा ठराव करूनही त्यासाठी आवश्यक असलेले मंजुरीपत्र अद्याप दिलेले नाही. हे मंजुरीपत्र मिळण्यासाठी आता मराठा समाजाच्या नेते मंडळींने लढा उभारण्याची तयारी केल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे.

मराठा समाज भुसावळ (नोंदणी क्रमांक एफ 366) या सामाजिक संस्थेने पालिकेकडे 2009 मध्ये सेवाभावी कामासाठी खुला भूखंड मिळण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने कंडारी शिवारातील सव्र्हे क्रमांक 192 / 1 / 1 / 1 मधील 29 हजार चौरस फूट जागा या संस्थेला नाममात्र 201 रुपये भाडेकरारावर देण्याचा ठराव 28 जुलै 2009 रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेत केला होता. मात्र, जागा हस्तांतरित करण्यासाठी लागणारे मंजुरीपत्र गेल्या चार वर्षांपासून या संस्थेला मिळालेले नाही. त्यामुळे सामाजिक सभागृह अथवा अन्य प्रकल्प या जागेवर राबवण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मराठा समाजाला जी जागा देण्याचा ठराव करण्यात आला आहे, त्या जागेला पालिकेने संरक्षण भिंतही उभारली आहे.

पालिकेने 20 वर्षांत 90 संस्थांना दिली 12 लाख 85 हजार चौरस फूट जागा

सहनशीलतेचा अंत
तब्बल 90 संस्थांना ठराव करून पालिकेने जागा दिली आहे. मात्र, मराठा समाजाला सापत्न वागणूक दिली जात आहे. पालिकेने मराठा समाजबांधवांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.
-ईश्वर पवार, जिल्हा संपर्कप्रमुख, छावा संघटना, जळगाव

नगराध्यक्षांकडून टोलवाटोलवी
पालिकेने मराठा समाज भुसावळ या संस्थेला जागा हस्तांतरित करण्यासाठी लागणारे मंजुरीपत्र मिळावे, म्हणून समाजाच्या शिष्टमंडळाने 12 ऑगस्ट रोजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्याशी चर्चा केली होती. शिष्टमंडळात विश्वनाथ पाटील, ईश्वर पवार, महेंद्र पाटील, आनंद ठाकरे, अँड. तुषार पाटील, रवींद्र लेकुरवाळे, शैलेश ठाकरे, ज्ञानेश्वर आमले यांचा समावेश होता. ‘येत्या दोन दिवसात मंजुरीपत्र देतो’ असे आश्वासन नगराध्यक्षांनी त्यांना दिले होते. मात्र, अद्यापही या आश्वासनाची पूर्तता झाली नसून टोलवाटोलवी सुरू आहे.

आमचा हेतू प्रांजळ
मराठा समाजाला जागा देण्याचा पालिकेने ठराव केला आहे. जागा हस्तांतरणासाठी लागणारे मंजुरीपत्र मिळवण्यासाठी संबंधित संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी कागदपत्रांसह प्रशासकीय बाबींची पूर्तता करावी. त्यानंतर नियमानुसार करारनामा करून घ्यावा. वास्तविक पाहता मराठा समाज संस्थेकडूनच याबाबत पाठपुराव्याला विलंब झाला आहे. राजकारण करण्याचा प्रश्नच नाही. जागा देण्याबाबत पालिकेचा हेतू प्रांजळ आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणे हे आमचे कर्तव्य आहे.
-उमेश नेमाडे, नगराध्यक्ष, भुसावळ

समाज उभारणार लढा
पालिकेने मराठा समाजाला खुला भूखंड देण्याचा ठराव केला आहे. मात्र, जागा हस्तांतरित करण्यासाठी लागणारे मंजुरीपत्र दिले जात नाही. राजकीय द्वेषापोटी समाजाला झुलवले जात आहे. जागेसाठी आता मराठा समाज भविष्यात लढा उभारणार आहे.
-विश्वनाथ पाटील, माजी सदस्य, जिल्हा परिषद, जळगाव

ठराव झाल्याचा केला होता जल्लोष
पालिकेने मराठा समाज भुसावळ या संस्थेला खुला भूखंड देण्याचा ठराव केल्याने समाजबांधव तेव्हा आनंदित झाले होते. जल्लोषही झाला होता. त्यानंतर पालिकेच्या सभागृहातच ऑगस्ट 2009 मध्ये ठराव केल्याचे पत्र सुपूर्द करण्याचा सोहळा तत्कालीन पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडला होता. परंतु प्रत्यक्ष जागा हस्तांतरित करण्यासाठी लागणारे पत्र गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करूनही मिळालेले नाही.

सभागृहासाठी तांत्रिक अडचणी
मराठा समाजाला पालिकेने जी जागा देण्याचा ठराव केला आहे, तेथे सामाजिक व बहुउद्देशीय सभागृह उभारण्याचा समाजबांधवांचा प्रयत्न आहे. राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानने 11 ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता. त्यात पालकमंत्री संजय सावकारे यांनी ‘जागा असेल तर सामाजिक सभागृहासाठी 10 लाखांचा निधी देतो, पालिकेची एनओसी मिळवून दाखवा अन् बांधकाम सुरू करा’ असे खुले आव्हान मराठा समाजबांधवांना दिले होते. त्यानंतर खर्‍या अर्थाने मराठा समाजाच्या जागेच्या विषयाला वाचा फुटली आहे.