आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हास्याचे फवारे उडविणारा मंगेश दिसणार ‘चिरीमिरी’ घेताना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''प्रेक्षकांना आपल्या हास्यातून वास्तवाचे दर्शन घडवणारा सिनेअभिनेता मंगेश देसाई आता पैसे खाताना आपल्याला दिसणार आहे. ‘चिरीमिरी’ नावाचे नवीन नाटक लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात त्याने एक भ्रष्टाचार करणार्‍या 55 वर्षीय माणसाची भूमिका साकारली असल्याची माहिती ‘फु बाई फू ’ फेम मंगेश देसाई याने ‘दिव्य मराठी’ला दिली. दर्जी फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तो जळगावात आला होता. यावेळी त्याने ‘दिव्य मराठी’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भेटीत त्याने अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केली. ती त्यांच्या शब्दात..''

चित्रपटाच्या परीक्षणावर खूप गोष्टी अवलंबून असतात. अनेक प्रेक्षक हे समीक्षण वाचून चित्रपट पाहायला जातात. सतत टोकाच्या होणार्‍या परीक्षणामुळे अनेक चांगले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही तेच मराठी चित्रपटाचे दुर्दैव आहे. चित्रपट बनवताना त्यास लागणारी कोणतीच मेहनत न पाहता चांगला किंवा वाईट ठरवायला नको. याचा सुवर्णमध्य असायला हवा.

आजकाल रिअँलिटी शो कडे प्रेक्षकांचा अधिक ओढा आहे. कारण रिअँलिटी शो ने प्रेक्षकांची भूक भागते. ‘फू बाई फू’ यंदांचा सीजन खूप हिट झाला. लोकांना दररोज वेगळे, नावीन्यपूर्ण हवे असते. ते रिअँलिटीमध्ये मिळते. त्यासाठी माणूस वेळ काढून ते बघतो. मालिकांचे तसे नाही दररोज तेच तेच पाहायला कुणाला वेळ नाही. त्यामुळे सुजाण प्रेक्षक हा रिअँलिटीकडे सध्या वळतोय.

नाटक, मालिका आणि चित्रपटपर्यंतच्या प्रवासादरम्यान स्वत:ला ओळखत गेलो. नाटकात अडकलो होतो पण मी रमायचो मात्र पुढे गेलो नव्हतो. मग मालिकांमध्ये गेलो तेव्हा कळाले मी रमत नाहीये. ब्लाइंड गेम चित्रपट केल्यावर प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया पाहताना लक्षात आले प्रेक्षकांना मी आवडतोय ते माझी भूमिका ‘एन्जॉय’ करताय तेव्हा चित्रपटांकडे लक्ष केंद्रित केले. यात आर्थिक बाबीदेखील महत्त्वाच्या ठरल्या.

चांगले चित्रपट आणायचे असल्यास अगोदर कलावंतांचे पाऊल पडणे आवश्यक आहे. त्यामुळे मी स्वत:पासून सुरवात करीत अगोदर प्रस्ताव घेऊन आलेल्या नवीन दिग्दर्शकाला भेटतो, स्क्रिप्ट पाहतो, एखाद्या ओळख असणार्‍या दिग्दर्शकाला विचारतो तो व्यक्ती कसाय. सगळी माहिती घेतल्यावरच हो म्हणायचे की नाही हे ठरवतो. निर्मात्याला कमी बजेटमध्ये चांगला चित्रपट करून मिळतोय म्हणून तो अनुभव नसणार्‍या दिग्दर्शकाच्या भूलथापांना बळी पडतो आणि चित्रपट कोलमडतो. त्यामुळे चांगल्या दर्जाचे चित्रपट निर्माण होत नाही. म्हणून स्वत:पासूनच सुरवात करीत सर्व बाबी तपासून घेण्याचे कटाक्षाने सध्या पाळतो आहे.

स्ट्रगल हा प्रत्येक व्यक्तीला करावाच लागतो. पण तो काळ मात्र न विसरता येणारा असतो. माझ्या आयुष्यातील सगळ्यात आवडता काळ तो होता जेव्हा मी लोकल आणि बसमध्ये फिरायचो त्यामधून मला जी एनर्जी मिळायची ती आज हरवली आहे. अधिक सुखाचे आयुष्य झाल्याने, निवांतपणा आयुष्यात आल्याने क्रिएटिव्हीटी संपून जाण्याची भीती वाटते. म्हणून ते दिवस आजही आठवतात आणि परत जगायची इच्छा आहे. दरम्यान या प्रवासातील फायदाही मला झाला ‘फु बाई फू’मध्ये असे अनेक जिवंत पात्र मी रंगवले मत व्यक्त केले.

एकदा तरी ‘गॉडफादर’ची भूमिका साकारायची इच्छा आहे. आवाज, वेशभूषा बदलून तशी संयमी भूमिका आयुष्यात साकारायची. तसेच हे सगळे करीत असताना कोणी शिफारस करून दिलेला पुरस्कार न स्वीकारता स्वच्छ हेतूने दिलेला पुरस्कार मिळाल्यास तो अवश्य स्वीकारेन. कलेची जाण ठेवून जर कलावंतास पुरस्कार दिल्यास त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि नवीन करण्याची ऊर्जा मिळते.