आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या पाठिंब्याने पूर्ण झाला अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास- कीर्ती चौधरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मराठी चित्रपटसृष्टीत येण्याचा मानस असणार्‍या तरुणींनी नक्कीच या क्षेत्राचा विचार करावा. परंतु जे काही कराल ते आई-वडिलांना विश्वासात घेऊन करा, त्यांच्या विरोधात जाऊन करू नका, असा सल्ला नवोदित मराठी अभिनेत्री कीर्ती चौधरी हिने तरुणींना दिला. माझा अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास आईच्या पाठिंब्यानेच पूर्ण झाल्याचेही तिने या वेळी आवर्जून नमूद केले. ती मूळची पाडळसे (ता. यावल) येथील असून, सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहे. जळगाव येथे आली असता कीर्तीने ‘दिव्य मराठी’ शी संवाद साधला.

मराठी पडद्यावर स्वत:ला पाहण्याची इच्छा अनेक तरुण-तरुणींमध्ये सध्या दिसून येते. मात्र, मोजक्याच लोकांची इच्छा पूर्ण होत असते. लहानपणापासून अशीच इच्छा मनाशी बाळगलेली कीर्ती चौधरी हिने प्रत्यक्षात अमलात आणली.

ती म्हणाली की, लहान असताना वडील आम्हाला सोडून गेले. आई मला नेहमी सांगायची की, ‘तुझ्या वडिलांना तुला टीव्हीवर बघायचे होते. त्यांचे स्वप्न होते की माझी मुलगी याच क्षेत्रात करिअर करील.’ त्यामुळे माझा विश्वास अधिकच दृढ झाला. आईचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आत्मविश्वास अजून वाढला आणि नृत्यकलेपासून सुरुवात केली.

भरतनाट्यम् ते सीरियल
वयाच्या तिसर्‍या वर्षांपासून भरतनाट्यम् शिकायला सुरुवात केली. गोल्ड मेडल मिळविले व आठवीत असताना पहिली ‘देवीचा कौल’ ही एकांकिका केली. राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. तेव्हापासून माझ्या अभिनयाला वेगळे वळण मिळाले. बारावीत असताना मी ‘मन उधाण वार्‍याचे’ या सीरियलपासून टीव्ही करिअरची सुरुवात केली.

विरोधानंतरही प्रयत्न सोडले नाहीत
‘‘मी या क्षेत्रात काम करते हे आमच्या सर्वच नातेवाइकांना कळले होते. अनेकांनी मला यासाठी विरोधही केला. कोणी म्हणाले की, हे आपले काम नाही; पण आईचा पूर्ण पाठिंबा असल्याने मी खचले नाही. अखेर माझ्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यामुळे तरुणींनी प्रथम आपल्या पालकांना विश्वासात घ्यावे.

पहिला चित्रपट मार्चमध्ये
‘नवरा माझा भवरा’ हा कीर्तीचा पहिला चित्रपट असून, तो 22 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. कमलाकर गुंजाळ दिग्दर्शित या चित्रपटाकडून कीर्तीला मोठय़ा आशा आहेत. माझ्यासाठी ही खूप मोठी संधी असून, ही पर्वणीच असल्याचा भास होत असल्याचे ती मानते. तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले असून, या वर्षात आदिवासी जीवनावर आधारित ‘कमळी’ हा चित्रपट करणार आहे.