आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Auther Dr. Bhalchandra Nemade In Jalgaon

पुरस्काराने साहित्याचा दर्जा उंचावतो, ज्येष्ठ साहित्यिक नेमाडे यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पुरस्कारामुळे साहित्याच्या अभिव्यक्तीचा दर्जा उंचावतो. अशा पुरस्कारांमुळे खान्देशातील साहित्य चळवळीला चालना मिळून दर्जेदार साहित्य पुढे येईल, असे मत साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी येथे आज व्यक्त केले.

भवरलाल अँण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशन आणि बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जैन हिल्स येथे ‘साहित्य पुरस्कार 2013’ सोहळा झाला. या सोहळ्यात ‘कवयित्री बहिणाबाई’ पुरस्कार सानिया यांना, ‘बालकवी ठोंबरे’ पुरस्कार इंद्रजित भालेराव यांना आणि ‘ना.धों. महानोर’ पुरस्काराने डॉ.अनिल अवचट यांना साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उद्योगपती भवरलाल जैन, सामाजिक कार्यकर्ते दलिचंद जैन, ज्योती जैन, लेखिका सानिया यांचे पती बलरामन हे उपस्थित होते. 50 हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. खान्देशातील वाचनसंस्कृती मागासलेली असून, ती सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यभर मी या संस्कृतीचे गोडवे गातो; इथे मात्र मान खाली घालावी लागते. हे चित्र बदलण्यासाठी आता नेटाने प्रयत्नव्हायला हवेत, अशी अपेक्षाही भालचंद्र नेमाडे यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद जोशी यांनी केले.

700 वर्षे कविता जात्याभोवतीच
‘कुळंबिणीची कहाणी’ ही कविता बालकवी ठोंबरे आणि महात्मा फुले यांच्यावर आधारलेली आहे. 700 वर्षे कविता जात्याभोवतीच गुंफलेली होती. कवितालेखनापूर्वी बालकवींचे विशेष आकर्षण होते. त्यांच्या नावाच्या पुरस्काराने गौरविल्याचा अभिमान वाटत असल्याचे इंद्रजित भालेराव यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी कविता करणार्‍यांवर विडंबनात्मक कविता सादर केली.

बहिणाबाईंच्या वाटेवरच प्रवास
बहिणाबाईंच्या वाटेवरच मी प्रवास करीत आहे. माणसा-माणसाच्या नात्यावर लिहिण्यावर अधिक रुची असल्याने माणसाचा आंतरिक प्रवास, आंतरिक संघर्ष महत्त्वाचे आहेत. त्यावर लिखाण करीत राहिले. महिलांचे लिखाण विशिष्ट चौकटीतील समजले जायचे. तो गैरसमज दूर झाला आहे. त्यापलीकडेही साहित्य दिसू लागले आहे. बहिणाबाईंनीही आयुष्याची समज साध्या-सोप्या भाषेत करून दिलीय. तो प्रयत्न मी करीत आहे, असे लेखिका सानिया यांनी सांगितले.
..तरच समाज टिकेल
विषमता दूर झाली तरच समाज टिकेल. सध्या समाजात सर्वत्र विषमता निर्माण झाली आहे. जीवन सर्वांच्या हिताचे झाले पाहिजे. ते कोण्या एकाच्या मालकीचे असता कामा नये. त्यासाठी अधिक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्नकेला पाहिजे. यातून निश्चित सकस साहित्य पुढे आल्यावाचून राहणार नाही. आजवर मी अनेक व्यक्तिरेखा लेखनातून रेखाटल्या. कुणाचेही अनुकरण न करता आपले अनुभव मांडत राहिलो, असे डॉ. अनिल अवचट यांनी सांगितले.