जळगाव- आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ‘धग’ चित्रपटाकडे जळगावच्या प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी रीलिज झालेल्या चित्रपटांमध्ये ‘धग’ हा मराठी चित्रपटही होता. अनेक अडचणींवर मात करीत या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात यश आले होते. या चित्रपटासह माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांची ‘गुलाब गॅँग’ही गर्दी खेचू शकली नाही. त्यामुळे मराठीसह हिंदी चित्रपटांवर परीक्षांचा मोठा परिणाम दिसून आला. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणार्या मराठीतील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘धग’ चित्रपटाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अखेर 7 मार्चचा मुहूर्त लाभला. मात्र, परीक्षा सुरू असल्याने प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. या चित्रपटाचा दररोज एक शो दाखवण्यात येणार आहे. विशाल गवारे यांची निर्मिती असून शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शन केले आहे. उषा जाधव, उपेंद्र लिमये यांच्या यात प्रभावी भूमिका आहेत.