आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medical Admission Starts 11 July Last Dates, Jalgaon Khandesh

मेडिकल’चे प्रवेश सुरू: विद्यार्थ्यांमध्ये चुरस, 11 जुलै लास्ट डेट

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- इंजिनिअरिंगपाठोपाठ मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेस सोमवारपासून सुरुवात झाली. सीईटीचा निकाल लागल्यानंतर दोन आठवड्यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे (डीएमईआर) प्रवेश प्रक्रियेची रुपरेषा जाहीर झाली. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी 29 जून रोजी माहिती पुस्तिकांचे वितरण सुरू झाले आहे. माहिती पुस्तिका खरेदी करण्यासाठी सीईटी परीक्षेची गुणपत्रिका दाखवावी लागणार आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 11 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. सीईटी परीक्षेत अपेक्षेपेक्षा उत्तम यश मिळविल्यामुळे यंदा प्रवेशासाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबईतील ग्रॅंट मेडिकल कॉलेज, पुण्यातील बी.जे.मेडिकल कॉलेज व औरंगाबाद आणि नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभागीय केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यातील 58 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अनुदानित महाविद्यालय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकल, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, ऑडिओपॅथी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजीओथेरेपी आणि नर्सिंग अभ्यासक्रमाच्या सात हजार जागा आहेत.
विकलांगांसाठी पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतनचे प्रवेश सुरू
पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाकरिता दहावी उत्तीर्ण विकलांग विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षाच्या यंत्र अभियांत्रिकी, स्थापत्य, विद्युत, विद्युतसंचरण व संगणक, माहिती व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासर्व शाखांसाठी प्रत्येक शाखेत 25 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी विकलांगतेचा व्हीआरसी, मुंबई यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर शारीरिक विकलांगतेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.
ऑनलाइन प्रवेश नाही
तीन वष्रे मुदतीचे पूर्णवेळ अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाकरिता विकलांग विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती, वाहनभत्ता, मोफत पुस्तके, गणवेश, वसतिगृह व्यवस्था केली जाणार आहे. प्रवेश अर्जाची किंमत 400 रुपये तर आरक्षित वर्गासाठी 300 रुपये ठेवण्यात आली आहे.
एमबीबीएसच्या जागांमध्ये वाढ
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये यंदा तब्बल 3 हजार 595 जागांची वाढ करण्यात आली आहे. यातील 2 हजार 400 जागा नव्याने सुरू होणार्‍या 20 महाविद्यालयांमध्ये तर इतर एक हजार 195 जागा सध्याच्या महाविद्यालयांची क्षमता वाढवून तिथेच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मेडिकल कौन्सिलने मंजुरी दिलेल्या 20 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नऊ शासकीय, तर 11 खासगी महाविद्यालये आहेत.
फेक एसएमएस
प्रवेश घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेज देण्याचे फेक एसएमएस येत आहेत. खासगी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करणारे एसएमएस सध्या सुरू आहेत. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची स्वतंत्र वैद्यकीय सीईटी घेण्यात येते. या सीईटी परीक्षेत नापास झाले तरी संस्थाचालकांना पैसे दिल्यानंतर आपोआप प्रवेश दिला जातो, अशा अफवा सध्या रंगविल्या जात आहेत.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना औरंगाबाद केंद्र
जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभागीय केंद्र सुरू करण्यात आले आहे.
खासगी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया
आतापर्यंत खासगी महाविद्यालये स्वत:च्या सीईटीच्या माध्यमातून जागा भरत होते. मात्र, यंदापासून सुरुवातीचे दोन राउंड झाल्यानंतर खासगी महाविद्यालयातील रिक्त जागा भरण्यासाठी शासकीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी महाविद्यालयात प्रवेशास इच्छुक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.
प्रक्रिया कमी वेळेत आटोपण्याचे आदेश
वैद्यकीय प्रवेशप्रक्रिया 15 जुलैपर्यंत आटोपण्याचे आदेश यंदा सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने वैद्यकीय आणि दंत या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी 15 जुलै ही अंतिम तारीख ठरवून दिली आहे. हा निर्णय वर्षानुवष्रे सुरू राहणार आहे. त्यामुळे यापुढे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रक्रिया लवकर आटोपतील.