आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Medical Field News In Marathi, Jalgaon Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुमार वैद्यकीय सेवेसाठी मनपाकडून दुप्पट खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव महानगरपालिका नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी वर्षभरात साधारण 6.25 कोटी रुपये खर्च करीत असून त्यातले 6.12 कोटी रुपये केवळ पगारावर खर्च होत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयातून जेवढय़ा रुग्णांना वर्षभरात वैद्यकीय सेवा दिल्या गेल्या त्या सर्व काही खासगी रुग्णालयांतून दिल्या असत्या आणि त्याचे पैसे महापालिकेने खर्च केले असते तरी पालिकेला साधारण 2.75 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला नसता, ही वस्तुस्थिती आहे.


महानगरपालिकेच्याच आस्थापना अधीक्षकांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दवाखाने विभागाकडील कायम कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनावर दरमहा साधारण 50 लाख रुपये खर्च होत आहेत. सन 2013 या एका वर्षात या विभागाच्या पगारावर महापालिकेने 6 कोटी 12 लाख 48 हजार 60 रुपये खर्च केले आहेत. सन 2012-13 या आर्थिक वर्षात महापालिकेने दवाखान्यांसाठी 7.98 लाखांची औषधी, 1.42 लाख रुपयांची लॅब रसायने, 23,750 रुपयांची क्ष-किरण फिल्म, सुमारे 1 लाख रुपयांची साथरोग नियंत्रण औषधी आणि 46,784 रुपयांची श्वान दंशावरील लस खरेदी केली आहे. ही एकत्रित खरेदी 11 लाख 11 हजार 629 रुपयांची झाली आहे. या शिवाय दवाखान्यांसाठी वर्षभर वापरलेल्या विजबिलापोटी 5 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तिन्ही दवाखान्याच्या माध्यमातून वेगवेगळय़ा शुल्काच्या रूपाने महापालिकेला त्याच वर्षात 11 लाख 58 हजार रुपये मिळाले आहेत.


खासगी रुग्णालयांत अपेक्षित खर्च
महापालिकेने वर्षभरात ज्या वैद्यकीय सुविधा दिल्या त्या जर विविध खासगी रुग्णालयात रुग्ण पाठवून त्यासाठी रोख रक्कम अदा केली असती तर निम्मेपेक्षाही कमी खर्चात नागरिकांना उत्तम सुविधा मिळाल्या असत्या, असा निष्कर्ष समोर येतो आहे.


चांगली रुग्णसेवा देणार्‍या सुपरिचित रुग्णालयांमधून घेतलेल्या माहितीनुसार विविध खासगी रुग्णालयातून नॉर्मल प्रसूतीसाठी साधारण 5 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे 2678 महिलांच्या प्रसूतीसाठी महापालिकेला अन्य रुग्णालयात 1 कोटी 33 लाख 90 हजार रुपये खर्च आला असता. सिझेरियन प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात सरासरी 20 हजार रुपये खर्च गृहीत धरला तर 449 सिझेरियनसाठी 89 लाख 80 हजार रुपये खर्च झाले असते. ज्या डॉक्टरांकडे ओपीडीत रांगा असतात त्यांच्याकडे इंजेक्शनसह येणारा खर्च माणसी 60 रुपये गृहीत धरला तर 78,596 बाहय़रुग्णांसाठी 47 लाख 15 हजार 760 रुपये खर्च झाले असते. हा एकूण खर्च 2.71 कोटी रुपयांच्या आसपास होतो. म्हणजे पावणेतीन कोटी रुपये खर्च करून महापालिका त्याच सुविधा नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकली असती हे उघड आहे.


सेवा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या (2012-13)
78,596 तपासणी केलेले बाहय़रुग्ण
2,678 नॉर्मल प्रसूती
449 सिझेरियन प्रसूती