आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपकरी डॉक्टरांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संपाचा रविवारी सहावा दिवस होता. राज्य शासनाने त्यांच्या मागण्या मान्य तर केल्या नाहीच, उलट ‘मेस्मा’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आमदार गिरीश महाजन आणि आमदार गुरुमुख जगवाणी हे रविवारी संपकरी डॉक्टरांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा सल्ला संपकर्‍यांना दिला. त्यावर सध्या सुरू असलेल्या ठिकाणी तीनच दिवसांची परवानगी असल्याने ‘मॅग्मो’च्या सदस्यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे करणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह नेऊन ठेवा ‘मॅग्मो’च्या संपकरी डॉक्टरांना रविवारी आमदार गिरीश महाजन आणि डॉ.गुरुमुख जगवाणी यांनी संपकरी डॉक्टरांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा सल्ला दिला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह नेऊन ठेवा व चपला फेका. तेव्हाच मागण्या मान्य होतील, असे सांगितले.
उपमुख्यमंत्री संपकर्‍यांशी बोललेच नाहीत
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी जळगाव जिल्हा दौर्‍यावर होते. या वेळी ‘मॅग्मो’चे शिष्टमंडळ त्यांना भेटले. मात्र, त्यांनी संपकरी डॉक्टरांशी बोलणे टाळले. पत्रकारांनी याविषयी विचारले असता, संपकर्‍यांवर ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. तसेच डॉक्टर ही अत्यावश्यक सेवा असून, संपाचा मार्ग रास्त नाही. डॉक्टरांच्या मागण्या आज मान्य केल्यास इतर विभागांचे कर्मचारीही लगेच येऊन उभे राहतील, असे पवार म्हणाले.

‘सिव्हिल’मध्ये दोघांचा मृत्यू
जिल्हा सामान्य रुग्णालयात मधुमेहाने आजारी असलेल्या गिरीश प्रल्हाद क्षीरसागर (वय 45, रा.मारुतीपेठ) यांच्यावर 28 जूनपासून उपचार सुरू होते. मात्र, रविवारी सकाळी 6 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच पूनम हिरामण बाविस्कर (वय 24, रा.साळवा, ता.धरणगाव) हिला मेंदूज्वर झाल्याने 30 जूनपासून उपचार घेत होती. तिचाही रविवारी सकाळी 10 वाजता मृत्यू झाला.