आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meenatai Thackeray Complex On Kattaya Students Doing Smoking

मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सच्या कट्टय़ावर छोट्यांचे झुरके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील शालेय, महाविद्यालयीन ते अभियांत्रिकीच्या विविध शाखांच्या खासगी क्लासेसचे केंद्र बनलेले मीनाताई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्स सध्या वेगळ्याच समस्येत अडकले आहे. येथील कट्टय़ावर जमणार्‍या शहरातील विविध भागातील तरुणांच्या टोळक्यांनी या भागात दहशत बसवली आहे. यातून हाणामारी, टिंगळ टवाळीसोबत मुलींची छेडछाडही नित्याचीच बाब झाली आहे.
सेंट जोसेफ विद्यालयाच्या समोर असलेल्या मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्समध्ये विविध नऊ क्लासेस आहेत. तर शेजारी घरगुती चार क्लासेस आहेत. दररोज सायंकाळी क्लासेसच्या निमित्ताने किमान 400 विद्यार्थी येथे येतात. तर शाळा, कॉलेज संपल्यावर कट्टय़ावर 50 ते 100 जणांचे टोळकेही जमतात. सायंकाळी 6 वाजेनंतर नागरिकांसाठी रस्त्याने ये-जा करणेदेखील अशक्य झाले आहे.
छेडछाडीचे प्रकार वाढले
क्लासेससाठी येणार्‍या विद्यार्थिनींची छेडछाड करण्यासाठी काही तरुणांचे टोळके सायंकाळी येथे जमतात. क्लासेस चालक एकापाठोपाठ बॅचेस घेत असल्याने बॅच संपल्यावर बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांविषयी त्यांना कर्तव्य नसते. त्यामुळे क्लास आटोपून काही जण कट्टय़ावर थांबून राहतात.
स्टंटबाजी, अल्पवयीनांचे झुरके
क्लासेस कम कट्टय़ावर येणारे आठवी ते दहावीचे शाळकरी विद्यार्थीदेखील सिगारेटचे झुरके आणि गाड्यांवर स्टंटबाजी करून एकमेकांशी पैज मारणे, इम्प्रेस करणे आदी प्रकार करीत आहेत. क्लासेससाठी दुचाकी, चारचाकी घेऊन येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये त्यातून भांडणे, हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे अल्पवयीन आहेत.
पालकांनीही घ्या काळजी
मुलांचे क्लासेसचे ठिकाण, क्लासेसमधील त्याची उपस्थिती, वेळेत जाणे-जाणे, मित्रांचे सर्कल, त्याचे वागणे आदी बाबींवर पालकांनी लक्ष दिले पाहिजे. मुलांशी संवाद साधून त्यांची विचारपूस करणे आवश्यक आहे. तसेच क्लासेस चालकांकडेदेखील चौकशी केली पाहिजे. पालकांनीदेखील पाल्यांबाबतीत सतर्क राहिले पाहिजे, अशी अपेक्षा क्लासेसचालक व्यक्त करीत आहेत.
शिक्षकांनी काळजी घ्यावी
विद्यार्थ्यांना सूचना देणे, काही वेळा वैयक्तिक लक्ष देऊन त्याला सांगितले पाहिजे. काही वेळा क्लासेसच्या बाहेर येऊन तो टोळक्यांमध्ये थांबला तर नाही ना हे पाहिले पाहिजे. शिक्षकांनी ऐवढी काळजी घेतली तरी हे प्रकार थांबू शकतील. तरुण भाटे, क्लासेसचालक.
चालणेदेखील मुश्किल
या भागात सायंकाळी नागरिक रस्त्याने पायी सुद्धा चालू शकत नाही. कारण मुले सुसाट गाड्या चालवितात. काही रस्त्यावरच उभे राहतात. गोंधळातून काही वेळा भांडणेही होतात. याकडे पोलिसांनी लक्ष द्यायला हवे. श्वेता प्रभुदेसाई, नागरिक
क्लासेसचालकांचे दुर्लक्ष
या भागात 10 पेक्षा अधिक खासगी क्लासेस आहेत. क्लासला येणारे विद्यार्थी क्लासच्या बाहेर पडल्यानंतर घरी जातात की, बाहेरच थांबून राहतात. याबाबत क्लासेसचालकांनी विद्यार्थ्यांना सूचना देणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे, पालकांना कळविणे अपेक्षित असले तरी ती जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी नाही. विद्यार्थी क्लासच्या बाहेर गेल्यानंतर दुसरी बॅच सुरू होते. त्यामुळे विद्यार्थी बाहेर थांबला आहे की नाही? याबाबत लक्ष दिले जाऊ शकत नसल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान, कट्टय़ावरील प्रकार एखाद्याच्या जीवावरदेखील बेतूू शकतात, अशी भीती देखील तेथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांचा चालेना इलाज
काही त्रस्त नागरिकांनी पोलिस आणि निर्भया पथकाकडे ही समस्या सांगितली. मात्र, पथक येऊन गेल्यावर पुन्हा रस्ता गर्दीने फुलत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. समोरच असलेल्या शाळेतील काही विद्यार्थीही शाळा सुटल्यावर कट्टय़ांवरच थांबत राहतात. त्यामुळे पोलिसांनी येथे कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.