आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन : धुळे शहरातील टंचाईवर मात करण्यासाठी त्वरित सूक्ष्म नियोजन करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - भविष्यात निर्माण होणा-या टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. टंचाई निवारणासाठी अधिका-यांनी सूक्ष्म नियोजन करून सर्वतोपरी प्रयत्न करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्याकडून देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी जिल्हाधिका-यांनी टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, पाणीटंचाई निर्माण होणा-या गावांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात सडगाव, जुन्नेर, कुंडाणे, वलवाडी (धुळे तालुका), भामेर, रायपूर, शेवाळी, धामणदर, पारगाव, म्हसाळे (साक्री तालुका), वारूड, रूपनरवाडी (आरावे) (शिंदेखडा तालुका) या गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. गावातील लोकांच्या गरजेनुसार टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टंचाईबाबत नियोजन करून लोकांना रोजगार हमी योजनेची कामे, पिण्याचे पाणी व जनावरांना चारा उपलब्ध व्हावा याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, त्यासाठी अधिका-यांनी योग्य नियोजन करावे. कोणीही मजूर जिल्ह्याबाहेर जाणार नाही, रोजगारापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी, अशी सूचना बैठकीत जिल्हाधिका-यांनी केली.
टंचाई कृती आराखडा
सन 2014साठी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात 73 गावे व 20 पाड्यांमध्ये 97.15 लक्ष रुपये अंदाजित रकमेच्या 117 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यात तीन तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, 51 विंधन विहिरी, कूपनलिका घेणे, 25 विहिरी खोल करणे, 29 खासगी विहिरी अधिग्रहण करणे, नऊ गावांना टॅँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे आदी प्रस्तावित आहे.

चाराटंचाईबाबत तूर्त समस्या नाही
जिल्ह्यात पाच लाख 40 हजार 804 लहान, मोठे जनावरे आहेत. या जनावरांना पाच लाख 29 हजार 200 मे. टन चा-याची आवश्यकता आहे. यावर्षी जिल्ह्यात जुलै 2014 अखेर सहा लाख 40 हजार 680 मे. टन चारा उपलब्ध आहे. त्यामुळे तूर्त तरी जिल्ह्यात चाराटंचाईची कोणतीही समस्या नाही.

यांची होती उपस्थिती
बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे (धुळे), आर. आर. पाटील (शिरपूर), महापालिका आयुक्त दौलतखान पठाण, सर्व तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.