आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलाचा प्रश्न अडलाय पालिकेच्या 25 लाखांसाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रेल्वेमुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकमेव पर्याय असलेला शिवाजीनगर उड्डाणपूलदेखील जुना झाला आहे. शिवाजीनगर आणि पिंप्राळा पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी महापालिकेने तांत्रिक प्रस्तावासाठी 25 लाख रुपये भरणे आवश्यक आहे. मात्र, पालिकेकडे यासाठी निधीची तरतूद नसल्याने काम रखडले आहे. पालिकेने तांत्रीक प्रस्तावासाठी 25 लाखांची तरतूद करावी यासाठी पालकमंत्र्यांनी पालिकेच्या अभियंत्याशी चर्चा केली. प्रभारी आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी तत्काळ निधीची तरतूद करणार असल्याचे या वेळी सांगितले.

शहरातून जाणार्‍या रेल्वेमुळे निर्माण झालेली वाहतुकीची अडचण दूर करण्यासाठी शिवाजीनगर उड्डाणपुलाचे रुंदीकरण, पिंप्राळा रेल्वेगेट येथून नवीन उड्डाण पुलासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी शनिवारी बैठक घेतली. या दोन्ही पुलाचे काम सुरू करताना पर्यायी रस्ता म्हणून बजरंग पुलाला लागून आणखी दोन बोगदे तयार करावे लागणार आहेत. महापालिकेने तत्काळ पैसे भरल्यास दीड महिन्यात बोगद्याचे काम पूर्ण करू, असे आश्वासन रेल्वेच्या अधिकार्‍यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत दिले.

शिवाजीनगर पुलाचे रुंदीकरण : शिवाजीनगरातील जुन्या उड्डाणपुलाचे रुंदीकरण करण्यासाठी 18 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातदेखील पालिकेला 10 टक्के निधी द्यावा लागणार आहे. पुलाची रुंदी वाढवून एक बाजू शिवाजीनगरात उतरते तर दुसरी दूध फेडरेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर जाणार आहे. याबाबत डिझाइन बनविणे आणि त्याला तांत्रिक मंजुरी देण्यासाठी पालिकेला 25 लाख रुपयांची तरतूद करावी लागेल.

यांची होती उपस्थिती : जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, रेल्वेचे वरिष्ठ अभियंता डी.आर.टेंभुर्णे, महापालिकेचे अभियंता डी.एस.खडके, सुनील भोळे, शशिकांत बोरोले, योगेश बोरोले, भूसंपादन अधिकारी दीपमाला पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे उपस्थित होते.

समांतर रस्त्यासाठी पैसे देणार : समांतर रस्ते बनविण्यासाठी महापालिकेकडे पैशांची तरतूद नाही. रस्ते लवकर व्हावे यासाठी प्रस्ताव द्या, राज्य शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी दिले. समांतर रस्त्यासाठी 45 कोटी रुपयांची गरज असून पहिल्या टप्यात 11 कोटींची कामे करण्यात येत असल्याचे अभियंत्यांनी यावेळी सांगितले.