आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेगा रिचार्ज म्हणजे निसर्गाचा चमत्कार, दाेन हेलिकाॅप्टरमधून पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : बैलजोडीच्या साह्याने चालणाऱ्या कांदा पेरणीयंत्राचा कासरा हाती घेऊन बैलजोडी हाकताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जळगाव/सावदा/रावेर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खंडव्याचे खासदार नंदकुमार ठाकूर, अामदार हरिभाऊ जावळे, केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाचे सचिव अमरजित सिंग यांनी रविवारी सकाळी महाराष्ट्र अाणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील मेगा रिचार्ज प्रकल्पाची दाेन हेलिकाॅप्टरमधून पाहणी केली. त्यावेळी मेगा रिचार्ज म्हणजे निसर्गाचा चमत्कार असल्याचे उमा भारती यांनी सांगितले.

देशातील नव्हे जगातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या प्रकल्पातून अंडरग्राउंड रिव्हर लिंकिंगचे काम केले जाणार अाहे. याबाबत उमा भारती यांनी ्ण सहकार्य करण्याचे अाश्वासन दिल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विमानतळावर पत्रकारांशी बाेलताना दिली.

जगातील पहिला महाकाय प्रकल्प म्हणून उल्लेख हाेत असलेल्या मेगा रिचार्जबाबत मुख्यमंत्री, केंद्रीय जलसंधारण मंत्री उभा भारती यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी रविवारी हवाई पाहणी केली. सकाळी ७.३० वाजता मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री पदाधिकाऱ्यांचा ताफा जैन हिल्स येथून दाेन हेलिकाॅप्टर सातपुड्यातील मेगा रिचार्ज प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेले. प्रकल्पाचे शेवटचे टाेक असलेल्या अनेर प्रकल्पापासून या क्षेत्राची हवाई पाहणी करण्यात अाली. महाराष्ट्र अाणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील भाागाची मंत्र्यांनी हवाई पाहणी केली. रावेर तालुक्यातील लाेहारा येथे प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट दिली. या वेळी खासदार रक्षा खडसे, तापी पाटबंधारे महामंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी व्ही. डी. पाटील उपस्थित हाेते.

मध्य प्रदेश महाराष्ट्रासाठी केंद्र शासनाकडून मेगा रिचार्ज प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, हा प्रकल्प जळगावकरांपुढे शासनाने मांडला पाहिजे. त्यावर नियोजन झाले पाहिजे, अशी भूमिका आहे. त्यामुळे मेगा रिचार्ज प्रकल्पाऐवजी मिनी रिचार्ज होणे गरजेचे असल्याची माहिती नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मेधा पाटकर म्हणाल्या, की राज्यातील जलग्रहण क्षेत्राकडे सरकारचे लक्ष नाही. सिंचनाचे नियोजन हे अंधानुकरण पद्धतीने केले जात आहे. त्यामुळे पाणी नियोजनातील विषमता थांबवणे गरजेचे झाले आहे. नर्मदा धरणाची उंची १२२ वरून १३९ मीटरपर्यंत वाढवण्यात आली अाहे. या विरोधात अाम्ही सुप्रीम कोर्टात उभे आहोत. तेथे गेट्स लावण्याचे काम सुरू आहे. शासन जलसिंचनाचे कायदे न्याय पायाखाली तुडवत आहे. या विस्थापित कुटंुबांना जलसमाधी देण्याच्या प्रतीक्षेत शासन आहे. मध्य प्रदेशासह गुजरातमधूनही याला विरोध होत नाही. याकामी विरोधी पक्षानेही चुप्पी ठेवणे, हे दुर्दैव आहे. नदी जोड प्रकल्प ही संकल्पना आहे. ही योजना बनली नाही. जलसिंचनाची योजना व्हावी, ही आमची भूमिका आहे. मात्र, त्या आधी नद्या, नाल्यांचे मिनी रिचार्ज व्हावे, अशी आमची मागणी आहे.

मुख्यमंत्र्यांनी संशाेधन केंद्रात धरला पेरणीयंत्राचा कासरा
महाअाराेग्यशिबिर पद्मश्री अाप्पासाहेब पवार पुरस्कार वितरणासाठी अालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी संध्याकाळी जैन हिल्सवरील संशाेधन केंद्रातील पेरणीयंत्राचा कासरा हाती घेऊन पेरणीचे प्रात्यक्षिक घेतले. या वेळी ते मुख्यमंत्रिपद विसरून शेतकऱ्यांच्या भूमिकेत शिरले. मुख्यमंत्री यांनी जैन हिल्स येथील संशोधन केंद्रात शेतकरी, शेतीतज्ज्ञ यांच्या समवेत वेळ घालवला. संत्रा आणि लिंबूवर्गीय पिकांमध्ये प्रक्रिया योग्य असलेल्या स्वीट लेमन अर्थात मोसंबीच्या संशोधन केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. टिश्युकल्चर लॅब, बायोटेक लॅब, संशोधन केंद्राच्या शेतीवर लावण्यात आलेली केळी, डाळिंब, आंबा, पेरू, मोसंबी आदी पिकांची माहिती घेत याच ठिकाणी कांदा पेरणीयंत्राची पाहणी केली. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी त्यांना माहिती दिली.
लाेकप्रतिनिधी अाणि अधिकाऱ्यांचे सहकार्य
मेगारिजार्चसंदर्भात शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह राष्ट्रीय जलविज्ञान संस्थांचे अधिकारी, केंद्रीय जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव, जल अायाेगाचे अधिकारी, वाल्मीसह राज्यातील जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित हाेते. १५ वर्षांपासून हरिभाऊ जावळे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला. अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याने प्रकल्प मार्गी लागला. टास्क फाेर्सच्या अहवालानंतर या प्रकल्पाने गती घेतल्याबद्दल मध्य प्रदेशच्या अामदार अर्चना चिटणीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अाशावाद व्यक्त केला. दरम्यान, दाेन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक हाेऊन प्रकल्प मार्गी लागण्याचे संकेतदेखील या बैठकीत मिळाले.

विहिरींच्या जल पातळीत इंचभरही वाढ नाही
सुकीनदीचे पाणी प्रायाेगिक तत्त्वावर मेगा रिचार्जसाठी १० विहिरींमध्ये साेडण्यात अाले अाहे. रावेर तालुक्यातील लाेहारा येथे करण्यात अालेल्या प्रयाेगाला केंद्रीय जलसंधारणमंत्री उमा भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. नदीचे १२ इंच पाइपलाइन एवढे पाणी विहिरीमध्ये सतत पडत असूनही विहिरीच्या जलपातळीत इंचभरही वाढ झालेली नाही. सारे पाणी भूगर्भात रिचार्ज हाेत असल्याचे पाहून उमा भारती यांनी मेगा रिचार्जचे ‘यह कुदरती अजुबा है,’ असे म्हणत काैतुक केले. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून सर्वाेतपरी सहकार्य करण्याचे अाश्वासन दिले.

पर्यावरण पूरक प्रकल्प
काेणत्याही भूसंपादनाशिवाय, नैसर्गिक साधनांचा वापर करून मेगा रिचार्ज प्रकल्प करणे शक्य अाहे. हजार हेक्टर शेतीला सिंचनाखाली अाणणे, २५ लाख लाेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राेजगार उपलब्ध करून देणे, तापीचे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरवणे, पाण्याची जलतापळी वाढविणे अाणि सातपुड्यातील निसर्गसंपदा वाचवण्यासाठी हा प्रकल्प अावश्यक अाहे. केंद्रातील अधिकारी याबाबत सकारात्मक अाहेत, मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण पूरक प्रकल्प म्हणून यासाठी पाठपुरावा करण्याचे अाश्वासन दिले अाहे. लवकरच डीपीअार (डिटेल प्राेजेक्ट रिपाेर्ट) तयार करून केंद्राकडे पाठवला जाईल. हरिभाऊ जावळे, अामदार
बातम्या आणखी आहेत...