जळगाव - मेहरूण तलावाच्या पाण्यात हद्द दाखवण्यात आलेले प्लॉटचे ले-आऊट मंजूर करण्याचा प्रताप महापालिकेकडून करण्यात आलेला आहे. मेहरूण परिसर आणि तलावाभोवतीच्या जागेला डीपी प्लॅनमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. जागा मिळेल तेथे ले-आऊट तयार करण्याच्या सपाट्यामध्ये ही मंजुरी देत असताना या भागातील प्लाॅटमधून जाणाऱ्या पाचोरा रस्त्याची जागा ही तलावामध्ये रिचवण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
मेहरूण तलावाभोवती असलेल्या अतिक्रमणाचा शोध घेताना भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे नंबर आणि महापालिकेच्या ले-आऊटचा आधार घेऊन एका प्लॉटचे क्षेत्र हे थेट तलावाच्या पाण्यात १३ फूट असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, हा घोळ पालिकेच्या डीपी प्लॅनमधला असल्याची माहिती एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
भूमी अभिलेख विभागाने आता झालेले बांधकाम, अलीकडेच उगवलेल्या झाडांचा आधार घेऊन टेबल मोजणीद्वारे तलावाचे क्षेत्र निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात मोजणीची पद्धतच चुकीची वापरल्याने तलावाचे अतिक्रमण काढणे अशक्य आहे. आजूबाजूच्या सर्व्हे क्रमांकाची मोजणी केल्यानंतरदेखील तलावाचे मूळ क्षेत्र किती या प्रश्नाचे उत्तर अद्यापही प्रशासनाला मिळाले नाही, हे विशेष म्हणावे लागेल.
रस्त्याचे क्षेत्र नावावरच
मेहरूणजवळून जाणारा जळगाव-शिरसोली-पाचोरा या रस्त्याची मूळ जागा अद्यापही त्या भागातील प्लॉटधारकांच्या नावावरच आहे. ही जागा पूर्वेकडे तलावामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. माेजणीमध्ये रस्त्याच्या जागेचा प्रश्न मार्गी लागल्यास तलावावरील अतिक्रमणाचा शोध घेणे सहज शक्य आहे.
‘त्या’ प्रकाराची माहिती घेणार
^तलावाच्या अतिक्रमणाचा विस्तृत अहवाल बघितला नाही. पाण्यात प्लॉट येत असल्याची माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतो. माहिती घेतल्यानंतर या संदर्भात निर्णय घेता येईल. एकनाथ खडसे, पालकमंत्री.