जळगाव - मेहरूण परिसरातील भिलाटीत शनिवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाचा खून करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 11 संशयितांना शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले होते. त्या संशयितांना रविवारी न्यायाधीश जयदीप पांडे यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मेहरूणमधील भिलाटीतील विजय गंगाराम पवार (वय 22) आपल्या मित्रांसह शनिवारी सायंकाळी 7.30 वाजेला नजीर किराणा दुकानासमोर असलेल्या सार्वजनिक जागेवरील वाळूवर बसला होता. त्या वेळी तांबापुराकडून आलेल्या 10-15 जणांच्या जमावाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. यात शुभम गायकवाड याने विजयच्या छातीच्या उजव्या बाजूस चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
11 संशयितांना अटक : विजयच्या खून प्रकणात कैलास बाबुलाल मोरे (वय 29), समाधान बाजीराव मालचे (वय 19), शुभम सुनील गायकवाड (वय 19), ईश्वर संजय पवार (वय 21), नितीन प्रकाश सोनवणे (वय 22), दीपक प्रकाश सोनवणे (वय 21), दीपक ऊर्फ टकल्या राजेंद्र ठाकरे (वय 17), भगतसिंग दिवाणसिंग गुमाने (वय 17), श्याम भिका सूर्यवंशी (वय 20), संतोष राजू पवार (वय 20), राहुल सुनील सूर्यवंशी (वय 19, सर्व रा. तांबापुरा, भिलाटी) या संशयितांना अटक केली असून राहुल ऊर्फ बोबड्या राजेंद्र पवार, सोनू अंबू मालचे, भारत अनिल सूर्यवंशी आणि इतर दोन-तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दीपक ठाकरे आणि भगतसिंग गुमाने हे अल्पवयीन असल्याने त्यांना बालनिरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे.
या वेळी सरकारपक्षातर्फे अँड. नितीन जगताप, आरोपींतर्फे अँड. कृणाल पवार, अँड.रशीद पिंजारी, अँड.सुनील इंगळे यांनी काम पाहिले.