आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वर्षांनी मेहरूण तलाव ओसंडून वाहिला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहराच्या सौंदर्यात भर घालणार्‍या मेहरूण तलावाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा जोरदार पाऊस झाल्याने तलाव सात वर्षांनंतर फुल्ल झाला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे शनिवारी दिवसभर तलावाचा सांडवा ओसंडून वाहत होता. सकाळी लेंडी नाल्याला पूर येऊन पंचमुखी महादेव मंदिराजवळील पुलावरून पाणी वाहत होते. तसेच नाल्याकाठी असलेल्या साईबाबा मंदिराच्या आवारात पाणी शिरले होते.

शहर व परिसरात सन 2006मध्ये अतिवृष्टी झाल्याने रात्रीतून मेहरूण तलाव भरल्याची घटना घडली होती. त्यानंतर गेल्या सात वर्षांत समाधानकारक पाऊस न झाल्याने तलाव भरून ओसंडून वाहण्याची घटना घडली नव्हती. तलावाच्या वरच्या बाजूला असलेल्या अंबरझरा तलावातून मेहरूण तलावात पाणी येत होते. तथापि, पालिकेतर्फे गेल्या वर्षी तलावातील अडथळे दूर करण्यात आल्याने यंदा आजूबाजूचे पाणी तलावास येऊन मिळत आहे. तलाव परिसरात गेल्या चोवीस तासांत जोरदार पाऊस झाल्यामुळे शनिवारी सकाळपासून तलावाचा सांडवा दिवसभर ओसंडून वाहत होता. रविवारीदेखील दिवसभर पावसाच्या सरी सुरूच होत्या. यामुळे विक्रेत्यांची संख्याही रोडावली होती.

तलावात 5 हजार 40 दलघमी साठा

सुमारे 72 हेक्टर क्षेत्रात असलेल्या या तलावातून मोठय़ा प्रमाणात गाळ काढण्याची मोहीम ‘दिव्य मराठी’ने राबवली होती. त्यानंतर पालिकेनेदेखील गाळ काढण्यासह बंद स्रोत मोकळे केल्याने तलावाची साठवणक्षमता वाढण्यास मदत झाली. सद्य:स्थितीत तलावात सुमारे 5 हजार 40 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.



12व्या शतकात तलावाची निर्र्मिती

मेहरूण तलावाचे काम 12व्या शतकात गोरखनाथ व त्यांच्या शिष्यांनी केल्याची नोंद पालिकेच्या शताब्दी ग्रंथात आहे. पाण्याची सोय झाल्याने तेव्हापासून तलावाच्या आजूबाजूला वस्ती झाली असावी. सन 1926मध्ये गिरणेवरून पाणी घेण्यापूर्वी जळगाव शहराला याच तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता.

वाघूरने ओलांडली पंचाहत्तरी; नदीकाठच्या गावांना इशारा

वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे साठय़ात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणाची साठवण क्षमता पूर्ण होण्यास दोन मीटरची पातळी बाकी आहे. पाऊस सुरूच राहिल्यास परिस्थिती पाहून धरणाचे दरवाजे पहिल्यांदाच उघडण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. त्यामुळे धरण व वाघूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जळगावकरांच्या पाण्याचा प्रo्न अवलंबून असलेल्या वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने यापूर्वीचे पाणी साठय़ाचे उच्चांक मोडले गेले आहेत. धरणाच्या 21 दरवाज्याचे काम सन 2007मध्ये पूर्ण झाले. दोन वर्षांपूर्वी 43 टक्क्यांपर्यंत धरण साठय़ाचा उच्चांक नोंदवला गेला होता. 22 सप्टेंबर रोजी धरणसाठय़ाने पंचाहत्तरी ओलांडली आहे. धरण 100 टक्के भरण्यासाठी सध्या दोन मीटरची लेव्हल बाकी आहे.

10 गावांना सतर्कतेचा इशारा

धरणात पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणात जलसाठा होत असल्याने पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे जळगाव तालुक्यातील निमगाव बुद्रूक, बेडी, जळगाव खुर्द, कडगाव, खिर्डी, तिघरे तर भुसावळ तालुक्यातील बेल्हाळ, सुनसगाव, गोंबी, साकेगाव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नवीन उच्चांक प्रस्थापित

धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर 19 सप्टेंबर 2011 रोजी धरण साठय़ाने उच्चांक गाठला होता. या दिवशी पाण्याची पातळी 229.350 मीटर होती. धरणातील साठा 1184.059 एमएमक्यू होता. त्या वेळी जिवंत जलसाठा 107.32 (43.18 टक्के) होता.