आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी व्यापाऱ्यांनी काढला संतापात मोर्चा; दुपारी स्थगिती मिळताच जोशात आतषबाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- पाच कंदीलच्या मार्केटवर महापालिकेचा हातोडा पडण्यापूर्वीच मंगळवारी संतप्त व्यापाऱ्यांनी मनपावर मोर्चा काढला. त्यानंतर सुमारे पाऊण तासाने आयुक्त संगीता धायगुडे यांनी व्यापाऱ्यांशी चर्चेची तयारी दर्शविली. भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यात मध्यस्थीची भूमिका निभावली. यानंतर रागात माघारी परत फिरलेल्या व्यापाऱ्यांना मात्र दुपारी सुखद धक्का बसला. मनपाच्या कामावर पुढील आदेश होईपर्यंत मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. अामदार अनिल गोटे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळेे व्यापाऱ्यांनी पाचकंदील परिसरात फटाक्यांची आतषबाजी केली.

पाचकंदील परिसरात महापालिकेच्या मालकीचे चार मार्केट आहेत. या ठिकाणी नवीन मार्केट बांधण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे चार वर्षांपासून हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित होता. काही दिवसांपूर्वी याबाबत धुळे न्यायालयाच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आॅगस्टपासून मार्केट तोडण्याचा निर्णय घेतला होता. तर व्यापाऱ्यांनी तोवर पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे. याच मागणीसाठी सकाळी पाचकंदील येथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मोर्चा काढला. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हा मोर्चा महापालिकेत धडकला. आयुक्त धायगुडे यांना भेटण्याची शिष्टमंडळाने इच्छा दर्शविली; परंतु उपायुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे बोट दाखवून आयुक्त धायगुडे यांनी भेट नाकारली. त्यानंतर व्यापारी जाधव यांच्या कार्यालयाकडे गेले; परंतु तेही इतर विभागावर गस्तीसाठी गेले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल यांची भेट घेतली. अग्रवाल यांच्यासह शिष्टमंडळ आयुक्त धायगुडे यांना भेटले. तसेच आपली मागणीही मांडली.आयुक्त धायगुडे यांनीही या वेळी सकारात्मक उत्तर दिले. दरम्यान, पोलिस निरीक्षक रमेशराव परदेशी त्यांच्या पथकाने या वेळी बंदोबस्त ठेवला होता.

काही वेळानंतर व्यापारी वर्ग माघारी फिरला; परंतु विधानसभेत चर्चेसाठी या प्रश्नावर आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर महापालिकेच्या निर्णयावर पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसे पत्रकही आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्धीला दिले आहे. त्यामुळे सकाळी संतापात मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांनी दुपारी जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी केली.
१०० पोलिसांचा बंदोबस्त
मार्केटमधील दुकाने काढण्यासाठी मनपाने पोलिस प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यानुसार तीन पोलिस निरीक्षक, तीन उपनिरीक्षक, ४० पुरुष महिला कर्मचारी तसेच दोन आरसीपी पथक सुरक्षेसाठी पुरविण्यात येणार होते, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. महापालिकेने जुने व्यापारी संकुले पाडण्याची तयारी केली. नवीन संकुले या परिसरात बांधण्यात येणार आहेत.

व्यापाऱ्यांनी मांडली भूमिका
ब्रिटिशकालीन बांधकाम असलेल्या या मार्केटबद्दल सन १९९२मध्ये पुन्हा ३० वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अजून दुकाने सुस्थितीत आहेत. या मार्केटमुळे किमान ५०० कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. नवीन संकुलात व्यापाऱ्यांना दुकाने द्यावीत. ताेपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी. तसेच याबाबत लेखी हमी देण्यात यावी, अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे; परंतु याबाबत प्रशासन बोलायला तयार नाही.

काय घडले चार वर्षांत
चार वर्षांपूर्वी हा मुद्दा चर्चेत आला होता. त्या वेळी मार्केटचा ठेकाही देण्यात आला हाेता. नियमानुसार या ठेकेदाराने सुमारे एक कोटी रुपये आगाऊ दिले आहेत. त्या वेळी व्यापाऱ्यांना तहसील कार्यालयाजवळील मैदानावर पर्यायी जागा देण्यात आली होती; परंतु ती नाकारण्यात आली. यानंतर पालिका व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. याचा निर्णय महापालिकेच्या बाजूने लागला आहे.

कर्मचाऱ्यांना दिली तंबी...
व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या कार्यालयात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीमधून पाहिले. कोणालाही वर येऊ देऊ नका, नाहीतर कारवाई करू, अशी तंबी या वेळी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. भीतीपोटी तीन कर्मचारी लागलीच पायऱ्यांवर उभे राहिले. याशिवाय सुरक्षा देणारा पोलिस कर्मचारीही त्यांच्या मदतीला थांबला होता. सुरक्षेचा असा बंदोबस्त ठेवण्यात आला.
असा घडला घटनाक्रम
११ वाजता : मनपावर धडकला संतप्त व्यापाऱ्यांचा मोर्चा.
११.१० वाजता : मनपा आयुक्तांनी नाकारली भेट.
११.४० वाजता : अनुप अग्रवाल शिष्टमंडळ दाखल.
१२.१० वाजता : आयुक्तांची बैठक झाली पूर्ण.
बातम्या आणखी आहेत...