धुळे - शहरातील विविध भागातील अतिक्रमण काढताना भेदभाव करू नका. त्याचबरोबर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. व्यापारी संकुलातील पार्किंगच्या जागेचा वापर दुकानासाठी करणाऱ्यांना नोटीस द्यावी, अशी सूचना आमदार अनिल गोटे यांनी केली. शहरातील अतिक्रमण पार्किंगच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, महापौर जयश्री अहिरराव, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक देवरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल वडनेरे आदी उपस्थित होते. महापालिकेतर्फे अतिक्रमण काढण्यात येत आहे; परंतु ही मोहीम राबवताना भेदभाव होत आहे. तसे करता नियमानुसार कारवाई करावी. तहसील कार्यालय महापालिकेजवळील अतिक्रमणे तातडीने काढावी. शहरातील सूर्य मंदिर ते अरिहंत भवनापर्यंत असलेल्या पन्नास फुटी रस्त्यावरील अतिक्रमण काढावे. पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला असून, वाहने लावण्यासाठी जागाच नसल्याने नागरिकांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात. त्यातून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी पार्किंगसाठी विविध ठिकाणी जागा निश्चित कराव्या. या जागांवर पार्किंगचा फलक लावण्यात यावा.
अवैध पद्धतीने वाहने पार्क करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. ज्या व्यापारी संकुलात पार्किंगच्या जागेत दुकाने बांधण्यात आली आहे त्या व्यापारी संकुलाच्या मालकांना नोटीस बजावण्यात यावी, अशी सूचना या वेळी आमदार अनिल गोटे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केली.
जनरेटर ठेवणाऱ्यांवर कारवाई
शहरातील काही बँकांमध्ये येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्याचबरोबर काही बँकेच्या बाहेर जनरेटर ठेवल्याने पार्किंगला जागा राहत नाही. त्यामुळे ज्या बंॅकांनी रस्त्यावर जनरेटर ठेवले आहे त्यांना नोटीस देण्यात येऊन कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी जनरेटरबाबत तक्रारी करूनही दखल घेतलेली नव्हती. अॅक्सिस बँकेसमोर हे जनरेटर रस्त्यालगत ठेवण्यात आले आहे. त्यामुळेच वाहतुकीची कोंडी होते.
मोकाट जनावरांवर कारवाई करा
बैठकीत मोकाट जनावरांवर कारवाई करण्यावर चर्चा झाली. मोकाट जनावरांवर तात्पुरती कारवाई करू नका. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, अशी सूचना बैठकीत झाली. त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनपाकडे कोंडवाडा नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे माेकाट जनावरांना कुठे ठेवता येईल का यावरही चर्चा करण्यात आली.
वितरण कंपनीकडे कामाची लिस्ट देणार
वीज कंपनीला उपकेंद्रासह कार्यालय उभारण्यासाठी महापालिकेतर्फे जागा देण्यात येणार आहे. त्या जागेच्या किमती इतक्या रकमेची कामे शहरात वीज कंपनी करून देणार आहे. या कामासाठी महापालिकेने अंदाजपत्रक करून ते वीज कंपनीकडे द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मिसाळ यांनी बैठकीत केली.
वाहनांचे थांबे हलवणार
शहरातील चारही बाजूला मुख्य रस्त्यांसह चौकात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे थांबे आहेत. त्यातून वाहतुकीची बऱ्याचदा कोंडी होते. त्यासाठी हे थांबे अन्यत्र हलवण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. त्यात वीर सावरकर पुतळा, नवरंग जलकुंभ, साक्री रोडवरील नेहरू पुतळा, पारोळा रोड चौफुली या थांब्यांचा समावेश आहे. त्यावर नियंत्रण ठेवले जात नाही.