आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या अभ्यासक्रमावरच ‘एमएचटी-सीईटी’, या वर्षापासून मिळणार प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘एमएचटी-सीईटी’ 5 मे रोजी घेण्यात येणार आहे. यंदा ही सीईटी राज्यपातळीवर होणार असून बारावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे.
राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश गेली दोन वर्षे जेईई आणि बारावीच्या गुणांना ५०-५० गुणांचे महत्त्व देऊन केले जात होते. जेईईची काठिण्य पातळी आणि यात राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची होणारी पीछेहाट यामुळे यंदा राज्यस्तरावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य परीक्षा मंडळाच्या इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित राज्यपातळीवरील सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे या शैक्षणिक वर्षापासून हे प्रवेश होणार आहेत.

निकष पूर्ण करावे लागणार
अभियांत्रिकीपदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठी खुल्या गटातील विद्यार्थ्याने राज्य परीक्षा मंडळ किंवा समकक्ष मंडळाच्या बारावी परीक्षेत भौतिकशास्त्र, गणित हे अनिवार्य आणि रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल, व्होकेशनल यापैकी एका विषयात मिळून किमान ५०% आवश्यक आहेत. मागासवर्गीय अपंग विद्यार्थ्यांना किमान ४५% आवश्यक आहे. औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया, नर्सिंग कौन्सिल आदी प्राधिकरणांच्या पात्रतेचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत.

कशी असेल परीक्षा ?
बारावीअभ्यासक्रमावरच ही सीईटी होणार असल्याने राज्य शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक (एचएससी) विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना मात्र सीईटीचा वेगळा अभ्यास करावा लागणार आहे. यासंदर्भात माहिती पुस्तिका देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी, औषध निर्माणशाास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र (प्रत्येकी ५० गुण) या दोन्हींची प्रश्नपत्रिका सामाईक असणार आहे. गणित (१०० गुण) आणि जीवशास्त्र (१०० गुण) या विषयांच्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील. ‘एमएचटी-सीईटी’त प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.

१५ % कोट्यावर निर्णय नाही
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या १५ टक्के जागा राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. इतर ८५ टक्के जागा या राज्य सीईटीतून भरल्या जाणार आहेत. मात्र, या जागा राज्य सीईटीतून भरणार की जेईईच्या माध्यमातून याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.