आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीतील कंपनीला आग; ५० लाखांच्या कापसाचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एमआयडीसीतील रुबी सर्जिकल या कंपनीला सोमवारी पहाटे ४.१५ वाजता आग लागली. या आगीत सुमारे ५० लाख रुपयांचा कापूस कापसाचे उत्पादन खाक झाले. सुमारे १० तास आगीचे तांडव सुरू होते. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

रुग्णालयांसाठी लागणार्‍या कापसाचे उत्पादन तयार करणारी ही कंपनी आहे. सोमवारी पहाटे कंपनीमध्ये दोन कर्मचारी एक सुरक्षारक्षक होते. अचानक पॅकिंग सेक्शनकडून धूर निघायला सुरुवात झाली. सुरक्षारक्षकाने चौकशी केली असता एका कोपर्‍यात आग लागल्याचे दिसून आले. क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाच्या १० बंबानी आग नियंत्रणात आणली. या शिवाय कंपनीची अग्निशमनची स्वतंत्र यंत्रणा असल्यामुळे नियंत्रण मिळवण्यास मदत झाली. स्टोअर रूमसह प्रोडक्शन डिपार्टमेंटमधील मशनरींना आग लागली होती. मात्र, मशिन्स लोखंडी असल्यामुळे केवळ त्यांच्या वायर्सचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत किंवा मदतकार्यात कोणीही जखमी झाले नाही. केतन राणे यांची ही कंपनी आहे.

एमआयडीसी भागात स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र, तेथे केवळ तीन-चार बंबच उपलब्ध असतात. हे बंब संपल्यानंतर शहरातून तसेच जैन इरिगेशन येथून बंब मागवावे लागतात. आगीचे स्वरूप मोठे असल्यास इतर ठिकाणांहून बंब पोहोचेपर्यंत बरेच नुकसान झालेले असते. त्यामुळे एमआयडीसीतील यंत्रणा वाढवली पाहिजे, असे मत उद्योजकांनी व्यक्त केले.

तीन वर्षांपूर्वीही घडली होती घटना
रुबीसर्जिकल या कंपनीत तीन वर्षांपूर्वीही आग लागली होती. त्या वेळी सुमारे १७ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. यानंतर काळजी म्हणून अत्याधुनिक सुविधांची पूर्तता करण्यात आली होती, असे कंपनीचे मालक केतन राणे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ
गेल्या१५ दिवसांत एमआयडीसीत ही तिसरी आगीची घटना आहे. या पूर्वी चटईच्या कंपनीला आग लागली होती. तेथेही ५० लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या सब स्टेशनला आग लागली त्यात ३५ लाखांचे आणि सोमवारी रुबी सर्जिकल या कंपनीला आग लागली. यातही ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या तिन्ही आगीत सुमारे दीड कोटींचे नुकसान झाले आहे.

सायंकाळपर्यंत धग कायम
पहाटे४.१५ वाजता लागलेल्या या आगीत कंपनीत तयार झालेले कापसाचे उत्पादन (सर्जिकल कॉटन) जळून खाक झाले. स्टोअर रूमच्या बाहेर आत कापसाचे ढिगारे होते. सकाळी अग्निशमन बंबांनी आगीच्या ढिगार्‍यांवर पाणी मारले होते. मात्र, तरीही सायंकाळी वाजेपर्यंत या ढिगार्‍यांखाली आगीची धग होती. दिवसभर पाणी मारून धग शांत करून कापसाचे गोळे बाहेर काढण्यात आले. कंपनीतील सुमारे ३० कर्मचारी दिवसभर उष्णतेमध्ये पाणी मारत अर्धवट जळालेल्या कापसाच्या गाठी बाहेर काढत होते.