आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ एमआयडीसीतील भूखंड बुकिंग हाऊसफुल्ल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या येथील 325 . 84 हेक्टरवरील औद्योगिकरणास लवकरच मूर्तरुप येणार आहे. एमआयडीसीत उद्योगासाठी जागा मिळण्याची ऑनलाइन बुकिंग हाऊसफुल्ल झाली असून मार्चअखेर वीज उपकेंद्र तयार होणार आहे. त्यामुळे सहा महिन्यात प्रत्यक्ष उद्योग उभारणी व हजारो बेरोजगारांना रोजगार मिळण्याची सुवर्णसंधी आहे.
जळगाव एमआयडीसीत प्लॉट मिळण्यासाठी किमान 500 जण प्रतीक्षेत आहेत. यामुळे अनेक उद्योजकांनी गेल्या दोन महिन्यांपासून भुसावळ एमआयडीसीत जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. या 15 दिवसांत हे प्रमाण वाढले. त्यामुळे एमआयडीसीने उद्योगासाठी जागा मिळण्याची ऑनलाइन बुकिंग पद्धत बंद केली. दरम्यान, येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र चौधरी यांनी एमआयडीसीत अभियंता म्हणून काम करताना पिंप्री चिंचवड व अहमदनगरच्या औद्योगिक विकासात सिंहाचा वाटा उचलला. भुसावळमध्येही त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. वीज उपकेंद्राची गरज वेळोवेळी पटवून दिली.
उपकेंद्रासाठी खरेदी - वीज वितरण कंपनीने औद्योगिक वसाहतीमधील पी - 1 क्रमांकाचा प्लॉट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकत घेतला आहे. यासाठीची सर्व कागदोपत्री पूर्तता करण्यात आली आहे. वीज उपकेंद्र मंजूर होण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी विशेष प्रयत्न केले होते. हिवाळी अधिवेशनापूर्वीच या कामास मंजुरी मिळाली असून मार्चपर्यंत उपकेंद्राचे काम पूर्ण होईल. या उपकेंद्रात उद्योगांसाठी स्वतंत्र फिडरची व्यवस्था राहणार आहे.
उद्योजकांना सोयी-सवलती देणार - राज्यातील उद्योजकांनी आता भुसावळवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे आगामी काळात शहर औद्योगिकीकरणात पुढे आल्याचे दिसेल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडूनही यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योगधंदे वाढीसाठी भविष्यात उद्योजकांना अजून चांगल्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. - ए. जे. अनंतकर, उपविभागीय अधिकारी, एमआयडीसी, धुळे
15 दिवसांतच चमत्कार - खडका,किन्ही आणि कन्हाळे या तीनही गावांच्या सिमेवर असलेल्या एमआयडीसीत दळणवळण, पाणी, वीज, मजूर आदी सर्वच दृष्टीने सोयीस्कर आहे. तरीही कित्येक वर्ष एमआयडीसी वनवासात होती. मात्र जळगाव येथील बुकिंग बंद झाल्याने एक ते 14 जानेवारीदरम्यान अचानकपणे चमत्कार होऊन प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने एमआयडीसीतील भूखंड बुकिंग हाऊसफुल्ल झाले.
एमआयडीसी माझे स्वप्न - एमआयडीसीचा विकास हे माझे स्वप्न आहे. एमआयडीसीच्या विकासासाठी उपकेंद्राची गरज होती, ती आता पूर्ण होत आहे. उद्योजकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनदरबारी सातत्याने प्रयत्न होतील. यामुळे तालुक्यात रोजगार मिळणार आहे. - संजय सावकारे, आमदार भुसावळ