आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MIDC Police Station Issue At Nashik, Divya Marathi

पोलिस ठाण्याच्या हद्दवादात तक्रारदाराची झाली फरपट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एमआयडीसी आणि जिल्हापेठ या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीवादात मंगळवारी रामेश्वर कॉलनीतील वसंत धनजी सानप यांना तक्रार दाखल करण्यासाठी दिवसभर फरपट करावी लागली. याबाबत तक्रारदाराने दुपारी ‘दिव्य मराठी’कडे कैफियत मांडली. दिवसाअखेर कोणत्याही पोलिस ठाण्यात त्यांची तक्रार घेतली गेली नव्हती.

सानप यांना 22 मे रोजी राजेश गुप्ता नावाने 9546361183 या मोबाइल क्रमांकाहून फोन आला. सदर व्यक्तीने आपण आरबीआयचे सुपर मॅनेजर बोलत असून तुमच्या एटीएमची माहिती द्या, असे सांगितले. त्यानुसार सानप यांनी आपल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएमची माहिती दिली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सानप यांच्या बँक खात्यातून चार हजारांची ऑनलाइन शॉपिंग झाल्याचे लक्षात आले. याविषयी इतर मित्रांशी चर्चा करून सानप हे मंगळवारी पोलिस मुख्यालयातील सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल करण्यासाठी गेले; पण दिवसभर त्यांना पोलिस प्रशासनाच्या टोलवा-टोलवीला सामोरे जावे लागले.
संबंधित व्यक्तीच्या बँकेच्या खात्यातून पैसे कमी झाले आहे. बँक जिल्हापेठ पोलिसांच्या हद्दीत आहे. त्यामुळे जिल्हापेठ पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल होईल. बी. के. कंजे, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी

बँक जिल्हापेठ हद्दीत असली तरी ट्रान्झेक्शन बँकेतून झाले नाही. ते ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यातच दाखल होईल. भाऊसाहेब पटारे, निरीक्षक, जिल्हापेठ पोलिस ठाणे

काय घडला प्रकार
मंगळवारी सकाळी 11 वाजता सानप मुख्यालयात गेले. येथे सायबर क्राइम विभागातील कर्मचार्‍यांनी त्यांना मार्गदर्शन करत आधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. पोलिस ठाण्यातून आमच्याकडे माहिती आल्यानंतर आम्ही लगेच चौकशी करतो असेही सांगितले. सानप हे रामेश्वर कॉलनीत राहतात म्हणून ते एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेले. दीड तास प्रतीक्षा केल्यानंतर पोलिस निरीक्षक बी. के. कंजे त्यांना भेटले. कंजे यांनी तुमची बँक जिल्हापेठ हद्दीत येते म्हणून तुम्ही तेथे गुन्हा दाखल करा, असा सल्ला दिला. त्यानुसार सानप जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आले. तेथे निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना ते भेटले. त्यांनी तुमची बँक जरी जिल्हापेठ हद्दीत असली तरी ऑनलाइन ट्रान्झेक्शन झाले आहे. त्यामुळे एमआयडीसीतच गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पटारे यांनी सांगितले. मदत म्हणून पटारे यांनी कंजे यांना फोनही केला. त्यानंतर सानप पुन्हा एमआयडीसीत गेले. कंजे यांना भेटले, मात्र कंजे यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. दुपारी 3 वाजेपर्यंत फरपट करूनही गुन्हा दाखल झाला नाही.

तो क्रमांक सुरूच
सानप यांना ज्या क्रमांकाहून फोन आला होता, तो क्रमांक अद्यापही सुरूच आहे. आपण आरबीआयचे सुपर मॅनेजर राजेश गुप्ता बोलत आहोत, असेच उत्तर समोरील व्यक्ती देत आहे.