जळगाव- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा 44 अंशांच्या जवळपास पोहोचला आहे. त्याचबरोबर दुधाच्या दराचा आलेखाही वर गेला आहे. शहराबाहेरून येऊन रतीब घालणार्यांच्या दुधाचे भाव शहरातील डेअरी आणि जिल्हा दूध संघाच्या (विकास) दरापेक्षा जास्त असल्याचे चित्र आहे. एरवी 40 ते 45 रुपये प्रतिलिटर असलेल्या दुधाने पन्नाशी गाठली आहे. लग्नाची मोठी तिथी असेल त्या दिवशी दुधाची टंचाई निर्माण होते.
शहरात एक लाख लिटर दुधाची गरज
जळगाव शहराच्या सभोवताली असणार्या अनेक खेड्यांमधून शहरात दूध येते. सध्या उन्हाळ्यामुळे चाराटंचाईही मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे चार्याचे भाव वाढल्याचा परिणाम दुधाच्या दरावर झाला आहे. शहरात दररोज सरासरी एक लाख लिटर दुधाची आवश्यकता असते.
लग्नसराईचाही मोठा परिणाम
सध्या लग्नसराई जोरात सुरू असून, लग्नांमध्ये विविध प्रकारच्या मिठाईकरिता दुधाला मोठय़ा प्रमाणावर मागणी असते. तसेच उन्हाचा तडाखा लक्षात घेता बहुतांश लग्नांमध्ये मठ्ठा, लस्सी, आइसक्रीम आदी दुग्धजन्य पदार्थांसाठी मोठी मागणी असते. यासह इतर पदार्थांमध्येही दुधाचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो.
दुधापाठोपाठ चहाचे भावही वधारले
दुधाचे भाव वाढल्याने चहा विक्रेत्यांनी चहाचे भावही वाढवले आहेत. सर्वसामान्यपणे 6 ते 8 रुपये प्रतिकप असे चहाचे दर सध्या झाले आहेत. त्याची झळ मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.