आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापीपात्रामध्ये रात्रंदिवस उत्खनन; प्रशासन बनले ‘धृतराष्ट्र’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- तापी आणि वाघूरचे पात्र सध्या तस्करांकडून पोखरणे सुरू आहे. रात्रंदिवस नदीपात्रातील खडक, गाळ आणि काही प्रमाणात वाळूची तस्करी होते. यासाठी तालुकाभरात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या ट्रॅक्टर, डंपरचा वापर होतो. मात्र, पाहून सुद्धा न पाहिल्यासारखे करणारे महसूल प्रशासन धृतराष्ट्राची भूमिका हुबेहूब वठवत आहेत.

महसूल विभागाकडून गौणखनिज संपदेची वाहतूक आणि खोदकाम करण्यासाठी रॉयल्टी भरल्यावर परवानगी मिळते. मात्र. यातही काळाबाजार होतो. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच खोदकाम करण्याची परवानगी असताना, तापीपात्रामध्ये रात्रीदेखील टॅक्टर आणि जेसीबीचे जथ्थे पहायला मिळतात. कंडारी शिवारातील तापीपात्रातील गाळ, वीटभट्टी व्यवसायासाठी अवैध उत्खनन करून काढला जातो. महसूल प्रशासन मात्र थातूरमातूर कारवाईचे सोंग करून ‘बड्या तस्करां’ना अभय देते.

यामुळे तापीपात्रात तस्करांची दबंगगिरी वाढली असून प्रशासनाला न जुमानता खोदकाम सुरू आहे. जेसीबीद्वारे नदीपात्रात खोदकाम करता येत नाही. मात्र, या नियमाला तिलांजली वाहिल्याचे भुसावळात दिसते. फक्त 10 फूट खोदकामाच्या नियमाला बगल देवून 25 फुटापर्यंत दरड तयार होईल, एवढे खोदकाम करण्यात येत आहे. तापीपुलाजवळच भूसुरुंगाचा स्फोट होत असल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. साकेगाव शिवारात वेगळे चित्र नाही. वाघूर नदीवरील रेल्वे पूल परिसरात अवैधरीत्या खोदकाम सुरू आहे. रेल्वेच्या भुसावळ येथील अधिकार्‍यांनी यासंदर्भात नुकतीच पाहणी केली आहे. दिवसाढवळ्या हे प्रकार सुरू असताना भुसावळमधील एकही लोकप्रतिनिधी याविषयी बोलण्यास तयार नाही.

रात्रीचे उत्खनन
कंडारी शिवारातील तापीनदीतून गाळ उपसला जातो. गौणखनिज वाहतुकीचे काम नियमाने आहे, तर रात्रीच्या अंधारात उत्खनन का ? रॉयल्टी न भरताच नैसर्गिक साधन संपत्तीची लूट होत असताना महसूल विभागाने हातावर हात ठेवले आहे.
-सतीश कांबळे, पर्यावरणमित्र

तक्रार नाही
महसूलने यापूर्वी गौणखनिज तस्कारांवर कारवाई केली आहे. जुगादेवी परिसरात शेतीशिवारात गौणखनिजाची परवानगी देणे बंद आहे. तक्रारी मिळाल्यास कारवाई होते. मात्र, सध्या अशी कोणतीही तक्रार नाही.
-बी.एस.वानखेडे, नायब तहसीलदार, भुसावळ