आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Dr. Govati Return Without Releasing Water

मंत्री डॉ.गावित पाणी न सोडताच परतले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयानंतर मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते काल शुक्रवारी रात्री अक्कलपाड्याचे पाणी सोडण्यासाठी गेलेले आमदार प्रा. शरद पाटील, जि.प. सदस्य किरण पाटील, किरण शिंदे यांना पाणी न सोडताच परतावे लागले. पाणी सोडण्यास अक्कलपाडा ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. प्रकल्पस्थळावरची परिस्थिती पाहून मंत्री गावित गाडीतून खालीही न उतरता तसेच परतले.

त्याचे असे झाले की, अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील पाणी पांझरा नदीतून सोडण्यासाठी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल शुक्रवारी दुपारी चार तास जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी कार्यकारी अभियंता यांना पत्र लिहून पाणीपट्टी संबंधित विभागामार्फत भरून घेण्याच्या अटीवर मृत जलसाठा सोडण्याची परवानगी दिली आहे. हे पत्र प्राप्त होताच काल शुक्रवारी रात्रीच मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते पाणी सोडण्यासाठी आमदार प्रा. शरद पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे किरण पाटील, किरण शिंदे हे गेले असता तेथील ग्रामस्थांनी विरोध केला. पूर्वसूचना न देता पाणी सोडू नये. हे पाणी सोडल्यानंतर नदीतील गावविहिरी आणि शेतपंपांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी परिस्थितीची पाहणी करावी, त्यानंतरच पाणी सोडण्याचा आग्रह धरल्यामुळे मंत्र्यांना खाली हात परतावे लागले. समजलेल्या माहितीनुसार अक्कलपाडा प्रकल्पस्थळी रात्री बराच वाद झाला. त्यामुळे तेथे पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला होता. हा बंदोबस्त दुसर्‍या दिवशी सकाळीही कायम होता. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी लेखी दिल्यानंतर दुसरा दिवस उजाडण्याआधीच म्हणजे रात्रीच पाणी सोडण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी मंत्री डॉ. विजयकुमार गावितांना घेऊन गेले. सोबत आमदार प्रा. शरद पाटीलही होते. रात्रीच पाणी सोडण्याचा घाट का म्हणून ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी धाव घेऊन विरोध केला.


प्रकल्पातील सद्य:स्थिती
* अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात आहे सध्या 650 एमसीएफटी पाणी.
* दोनशे डेड स्टॉक ठेवल्यानंतर 400 एमसीएफटी पाणी सोडावे लागेल.
* पाण्याचा पांझरा नदीत राहाणार केवळ 20 दिवस प्रवाह.
*आहे ते पाणी सोडल्यानंतर करायचे काय? प्रशासन पडले चिंतेत.


हातचे पाणी सोडल्यावर करायचे काय?
अक्कलपाडा प्रकल्पात सध्या 600 एमसीएफटी एवढे पाणी आहे. या वर्षी पाऊ स कमी झाल्यामुळे पांझरा नदी पूर्णपणे कोरडी आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत पाणी सोडले तर त्याचा प्रवाह फक्त 20 दिवस राहाणार आहे. त्याचा किती लाभ होईल, हे आज सांगता येत नाही. अजून पावसाळा अडीच महिने लांब आहे. पाऊस वेळेवर पडेलच याची खात्री नाही. त्यात आहे ते पाणी सोडले गेल्यावर करायचे काय? असा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे निर्णय घेणे हे प्रशासनाच्या दृष्टीने अडचणीचे आहे. धुळे शहर आणि तालुक्याचा विचार केला तर अक्कलपाडा हा एकमेव स्रोत शिल्लक आहे. त्यातही कमी पाणी आहे. त्यामुळे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. प्रकाश महाजन, जिल्हाधिकारी


पाण्याला येतोय राजकारणाचा रंग
अक्कलपाडा प्रकल्पाला 1984मध्ये मंज़ुरी मिळाली होती. हा प्रकल्प पूर्ण होण्यास अनेक अडथळे आले. हे अडथळे थोडे तांत्रिक असले तरी राजकारणाचेच अधिक होते. अवघ्या 36 कोटी रुपयांत होणारा प्रकल्प आज 500 कोटींपेक्षा अधिक रकमेचा झाला आहे. तो अजूनही पूर्ण झालेला नाही. या प्रकल्पात जेमतेम 30 टक्के जलसाठा झाला आहे. तो सोडण्यावरूनही मोठे राजकारण सुरू झाले आहे. अक्कलपाडा प्रकल्प साक्री तालुक्यात असला तरी त्याचा परिणाम हा धुळे तालुक्यातील राजकारणावर अधिक होणारा आहे. तो अपूर्ण राहिला तरी आणि पूर्ण झाला तरी अक्कलपाडा प्रकल्प हा धुळे तालुक्यातील आमदार निवडून आणण्याचे आणि पाडण्याचे काम करणारा आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी सोडण्यालाही आता राजकीय रंग येऊ लागला आहे.


झारीतल्या शुक्राचार्यांचा येतोय अडथळा
अक्कलपाडा प्रकल्पात पाणी कमी असले तरी ते न सोडणे हा पर्याय नाही. आज जी गावे दुष्काळाने होरपळत आहेत, त्यांना पाणी देणे महत्त्वाचे आहे. काल रात्रीची वेळ होती म्हणून पूर्वसूचना देऊन पाणी सोडा, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. ते योग्य म्हणून पाणी सोडले गेले नाही ; पण जिल्हाधिकार्‍यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेणेच योग्य राहील. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. ते आजच सोडणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर आम्हाला रस्त्यावर यावे लागेल. प्रशासनाने स्वत: निर्णय घ्यावा. झारीतले शुक्राचार्यच पाणी सोडण्याला विरोध करीत आहेत. पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर यावे लागेल. किरण शिंदे, राष्ट्रवादी कॉँग्रेस
पाण्याचे राजकारण नको- आ. प्रा. पाटील

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते पाणी सोडण्यासाठी काल रात्री आम्ही गेलो होतो ; पण तांत्रिक अडचण असल्यामुळे आम्ही पाणी न सोडता परत आलो, अशी माहिती आमदार प्रा. शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, अक्कलपाडा प्रकल्पात 650 एमएसीएफटी पाणी आहे. पांझरा काठच्या गावांचा उद्भव हा पांझरा नदीवरच अवलंबून आहे. त्यामुळे 400 एमसीएफटी पाणी सोडले तर दुष्काळी गावांना त्याचा लाभ होईल. त्यामुळे पाणी सोडण्याचा आपला आग्रह आहे. मंत्री जिल्हा दौर्‍यावर आहेत. ते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे असले तरी आपल्याला दुष्काळात पाण्याचे राजकारण करायचे नाही. त्यामुळे आपण त्यांच्या हस्ते का होईना, पाणी सोडण्याला होकार दिला होता. तथापि, तेथे गेल्यावर लोकांनी सांगितले की, नदीकिनारी असलेल्या विहिरींवर आमचे पंप आहेत. रात्री ते काढणे शक्य नाही. याशिवाय पाणी अचानक सोडले तर अन्यही नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे रात्रीची वेळ लक्षात घेता आम्ही पाणी न सोडता परत आलो. त्या ठिकाणी ग्रामस्थांचे म्हणणे लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतला असल्याचेही आमदार प्रा. शरद पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.