जामनेर - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यापूर्वी दिलेल्या शपथपत्रात मानपूर (ता. भुसावळ) येथील शेतजमिनीचा उल्लेख केलेला नाही. प्रॉपर्टीबाबत महाजन यांनी खोटी माहिती देऊन निवडणूक आयोगाची फसवणूक केली. त्यामुळे महाजन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी जामनेर तालुका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान, बळाचा वापर करून महाजन यांनी देवपिंप्री शिवारातील जमीन हडपल्याचा अाराेप अन्ना शंकर बावस्कर धनराज शंकर बावस्कर यांनी केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोर्चा आणला असतानाच देवपिंप्री येथील अन्ना शंकर बावस्कर धनराज शंकर बावस्कर या दोघा बांधवांनी मंत्री महाजन यांच्यावर जमीन हडपल्याचे आरोप केले. जळगाव- औरंगाबाद महामार्गावर देवपिंप्री फाट्याजवळ शरद अनंत कुलकर्णी यांच्या नावे जमीन होती. १९८० सालापासून आम्ही ती कसत हाेतो. मात्र, तीन वर्षांपूर्वी गिरीश महाजन यांनी पद बळाचा वापर करून आमच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले. पोलिसांकरवी आम्हाला शेतातून उचलून आणले. आमच्याविरुद्ध खोटे खटले दाखल करून आम्हाला जेलमध्ये डांबले. ती जमीन स्वत:च्या नावे करून घेतली. आज ती जमीन बाजार समितीचे सभापती तुकाराम निकम कसत आहेत. आम्ही कसत असलेली जमीन आम्हाला मिळावी, अशी मागणी या वेळी बावस्कर बंधूंनी केली. याबाबत मंत्री महाजन यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
यांची होती उपस्थीती
जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, माजी जिल्हा परिषद सदस्य डिगंबर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.शरद पाटील, माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय पाटील, प्रदीप लोढा, सागरमल जैन यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अाम्ही १९८०पासून जमीन कसत अाहाेत
देवपिंप्रीशिवारातील शरद कुलकर्णी यांची जमीन आम्ही १९८० पासून कसत होतो. आमचे वडील भीमराव शंकर बावस्कर यांच्या नावाचे तेव्हापासून पीकपेरे असल्याचे पुरावे आहेत. वडिलांनंतर ती जमीन आम्ही कसत आहोत. गिरीश महाजन यांनी पद बळाचा वापर करून आमच्यावर अन्याय केला. शेतातून ओढून काढून जमीन ताब्यात घेतली. अन्ना शंकर बावस्कर, तक्रारदार
छायाचित्र: जामनेरात काढण्यात अालेल्या माेर्चात सहभागी झालेले जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड कार्यकर्ते.