आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांनी जमिनी घ्याव्यात, पण चांगले उद्योग सोडून इतर उद्योग करू नयेत - आठवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - केवळ आरोपांमुळे एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज नव्हती. मात्र, त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत सखोल चौकशी व्हावी म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. मंत्र्यांना कारखाने काढण्यास, जमिनी घेण्यास अडचण असण्याचे कारण नाही. मात्र, त्यांनी जमिनी घेऊन चांगले उद्योग सोडून इतर उद्योग करू नयेत, असा टोला रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पत्रपरिषदेत लगावला.

खडसेंवर झालेल्या आरोपांमागे मुख्यमंत्र्यांचा हात असेल, असे वाटत नाही. त्यांच्यात वादही नाही. मंत्र्यांनी जमीन घेण्यास, कारखाने सुरू करण्यास काहीच अडचण नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही तेच केले आहे. उद्योग काढून रोजगार देत असतील तर गैर नाही. चांगले सोडून इतर उद्योग जमिनींवर करू नयेत. काँग्रेस, राष्ट्रवादीने आरोप करण्यापेक्षा सरकारला काम करू द्यावे.

संविधानबदलाचा खोडसाळपणा
मोदीसरकार संविधान बदलायला निघाले असल्याबाबत काँग्रेस खोटा प्रचार करीत आहे. संविधान ही सरकारची भूमिका असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सरकारने बाबासाहेबांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी केली. लंडनमधील त्यांचे घर विकत घेतले. २६ नोव्हेंबरला संविधान दिन सुरू केला.

पाणी अडवण्याबाबत पत्र
राज्यातदुष्काळी परिस्थिती आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीवर मोठ्याप्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवावे. ते अडवलेले पाणी कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, नांदेड आदी भागांपर्यंत नेण्यात यावे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळात रिपाइंला एक मंत्रिपद देण्याचे मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन माझ्याकडे आहे. मला राज्यात मंत्री होण्यात स्वारस्य नाही. ती संधी कार्यकर्त्याला देण्यात येईल. केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राज्यात रिपाइंला पाच टक्के इतर मित्रपक्षांना पाच असा सत्तेत दहा टक्के वाटा देण्यात यावा, अशी अपेक्षा रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी राज्यातील सत्तेच्या सहभागाविषयी पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले की, सरकारने आगामी महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी नवीन प्रभागरचनेबाबत घेतलेला निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मान्य नाही. नवीन प्रभागरचनेनुसार छोट्या पक्षांचे कार्यकर्ते मनपा पालिका निवडणुकांमध्ये निवडून येण्याची शक्यता कमी आहे. या निर्णयाविरोधात रिट पिटीशन दाखल केले जाणार आहे. सद्य:स्थितीत भाजप-सेना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या भांडणाची पुनरावृत्ती करत आहेत. मात्र, त्यांनी समन्वयाने सरकार चालवावे; अन्यथा २०१९मध्ये युतीची सत्ता येणार नाही. आगामी मनपा पालिका निवडणुकांत युती झाल्यास आम्ही भाजपसोबत आहोत, असे सूतोवाचही केले.
रिपब्लिकन पार्टी अाॅफ इंडिया उत्तर महाराष्ट्र विभागीय संकल्प शिबिरात बाेलतांना खासदार रामदास अाठवले अादी मान्यवर
बातम्या आणखी आहेत...