आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूवर आज मंत्र्यांची बैठक; बाजू सावरण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- नाटेश्वर कॉलनीतील गौरी कापडणेकर या तरुणीच्या मृत्यूनंतर शहरात डेंग्यू नाहीच, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गांभीर्य ओळखून उद्या रविवारी सकाळी यासंदर्भात तातडीची बैठक लावली आहे. त्यामुळे तोंडावर पडण्याची वेळ आलेल्या महापालिका प्रशासनाने शनिवारी सायंकाळी आरोग्य विभागाची बैठक घेतली. अनेक निर्देश-आदेशांचा भडिमार केल्यानंतर रविवारच्या सभेबाबत काही सूचनाही दिल्या. तथापि ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेत असलेल्या गौरी कापडणेकर (२१) या तरुणीचा काल शुक्रवारी डेंग्यूने खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. या घटनेमुळे गोंधळलेल्या महापालिका प्रशासनाने आरोपांना सामोरे जाताना या तरुणीचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला नसल्याचा खुलासा केला आहे. खुद्द आयुक्त संगीता धायगुडे यांनी तसा दावा केला होता. त्यामुळे शनिवारी दुपारपर्यंत या घटेबद्दल विशेष असे पाऊल उचलण्यात आले नव्हते. दरम्यान, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे शनिवारी धुळे दौऱ्यावर होते. तरुणीच्या मृत्यूचा विषय त्यांनी गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे उद्या रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास महापालिकेत बैठक घेण्याची सूचना केली आहे. या आदेशाबाबत महापालिकेलाही कळविण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभर आरोग्य विभागाची कोणतीही बैठक घेण्याची तसदी घेणाऱ्या मनपा प्रशासनाने सायंकाळी तडकाफडकी बैठक बोलावली. आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना बैठकीत सूचना देण्यात आल्या. शिवाय नागरी वसाहतींमध्ये जाऊन फवारणी धुरळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उद्या रविवारी होणाऱ्या बैठकीपूर्वीच पालिकेला सारवासारव करण्याची वेळ आली आहे. दोन अधिकाऱ्यांना नोटीस दिल्यानंतर मनपात नेमके काय सुरू आहे याचे चित्र उघड झाले.

काय सांगते आकडेवारी...
महापालिकाप्रशासनाच्या माहितीनुसार जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात ४४ रुग्णांच्या रक्तनमुन्यांची तपासणी झाली आहे. त्यात पाच जण बाधित आढळले आहेत. तर ऑगस्टपासून केवळ पाच रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याची माहिती प्रशासन देते.
बातम्या आणखी आहेत...