आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तस्करांनी पोखरले तापीचे पात्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरानजीकच्या तापी नदीचे पात्र गौणखनिज तस्करांनी पोखरण्यास सुरुवात केली आहे. पात्रातील खडक फोडण्यासाठी जेसीबीचा वापर करून भरदिवसा ट्रका भरून गौणखनिजाची वाहतूक केली जात आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी तब्बल 15 ते 20 फूट खोदकाम केल्याने खड्डे तयार झाले आहेत. या मुळे नैसर्गिक प्रवाहालाच बाधा पोहोचत आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात चांगदेवला तापी-पूर्णाचा संगम आहे. पूर्णा नदीतील गाळामुळे भुसावळ तालुक्यातील तापीच्या पात्रात वाळू अत्यल्प प्रमाणात सापडते. गाळाचे खडकात रुपांतर झाल्याने संपूर्ण पात्रस्तरित खडकांनी व्यापले आहे. मात्र, या नैसर्गिक संपदेला सध्या गौणखनिज तस्करांनी घेरले आहे. तापीच्या मध्यभागी पूर्व आणि पश्चिम दिशेला जेसीबीचा वापर करून डबर काढले जाते. हे डबर क्रशरपर्यंत पोहोचवून त्याची खडी तयार केली जाते. रविवारच्या दिवशी तर गौणखनिजाची अवैध मार्गाने वाहतूक करण्याचे प्रमाण दुप्पट आहे. महसूल विभागाकडून परमिट काढून नदीपात्रात खोदकाम करण्यासाठी फक्त 10 फुटापर्यंतच नियमाने परवानगी आहे. मात्र, याकडे कानाडोळा करून जेसीबीच्या सहायाने 15 ते 20 फूट खोल खोदकाम करून डबर काढले जातात.

हद्दीचा वाद गौणखनिज तस्करांना पोषक
शहरानजीक तापी नदीपात्रात गौणखनिजाचे अवैध उत्खनन गेल्या सहा महिन्यांपासून वाढले आहे. नदीच्या अलीकडे भुसावळ तर पलीकडे यावल तालुका आहे. त्यामुळे हद्दीचा मुद्दा पुढे करून कारवाई करायची कोणी, असा मुद्दा वारंवार पुढे केला जातो. हाच वाद तस्करांच्या पथ्यावर पडला आहे. त्यामुळेच नियमबाह्य उत्खनन सुरूच आहे.

तापी खोर्‍यात पक्ष्यांचा अधिवास सापडला धोक्यात
तापी पात्रात जेसीबीच्या वापरासह डबर खोदकामासाठी ब्लास्टिंगचा वापर केला जातो. त्याचा परिणाम नैसर्गिक परिसंस्थेवर होत आहे. फांदीधारी, पाणपक्ष्यांचा अधिवास नदीपात्र परिसरात धोक्यात आला आहे. हिवाळ्यात तापी खोर्‍यात येणार्‍या पक्ष्यांची संख्या कमालीची घटली आहे. जुगादेवी जंगलातील मोर, ससे, सायाळ असे वन्यप्राणीही स्थलांतरित झाले आहेत.

क्रेसिंगवर महसूलचे नियंत्रण नाही
भुसावळसह तापीच्या खोर्‍यांमध्ये क्रेसिंग व्यवसाय वाढले आहेत. गौणखनिजाच्या वाहतुकीसाठी सोयीचे व्हावे, म्हणून नदीकाठावरच क्रेसिंगची मशीनरी उभारण्यात आली आहे. महसूल विभागाने नियंत्रण ठेवले तर हा प्रकार बंद होऊ शकतो. तसेच नदीपात्रात खडक फोडण्यास मनाई करणे गरजेचे आहे.

नदीपात्रात पुलाच्या 500 मीटर अंतरात खोदकामाला नियमानुसार शासनाने बंदी घातली आहे. पुलाचे स्थापित आयुष्य टिकवून ठेवण्यासाठी हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, पुलाच्या 100 मीटर अंतरावरच सध्या खडक फोडण्याचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे भविष्यात पुलाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जुगादेवी जंगल परिसरातही गौणखनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे. माती, गाळ वाहुन नेला जात असल्याने तेथील वनसंपदा लयास गेली आहे. महसूल व वनविभागाने या जंगलात कारवाईसाठी धडक मोहीम राबवली तर येथील वनसंपदेचे जतन करता येऊ शकते. मध्यंतरी कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यात सातत्याचा अभाव आहे.

नदीपात्रात वहनामुळे भू-प्रारुपे तयार झाली आहेत. रेड टॅकेलाइट खनिजामुळे लहान आकाराचे भूछत्र, रांजणखडगे, व्ही आकाराची लहान दरी अशी नैसर्गिक प्रारुपे दृष्टीस पडतात. मात्र, अवैध उत्खननामुळे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी संघटनांनी आवाज उठवण्यासाठी पुढे आले पाहिजे.