आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीचा सहा वर्षीय दीपक सापडला वरणगावात, जाधव बंधूंनी दाखवली समयसूचकता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरणगाव- शाळेत जात नसल्याने आजी रागावली. या मुळे खट्ट झालेला दिल्ली येथील सहा वर्षीय दीपक थेट रेल्वेत बसला. भांबावलेल्या अवस्थेत भुसावळला उतरलेला दीपक आठवड्याभरापासून वरणगावात भीक मागत होता. मात्र, त्याला वरणगावचे जाधव बंधू, भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमुळे पुन्हा घर गाठता येणार आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, शाळेत जात नसल्याने दीपक विनोद माहोत (वय 6) याला आजी रागावली. यामुळे महिनाभरापूर्वी दीपकने तडक घराजवळील रेल्वे स्थानकावर जाऊन मिळेल ती गाडी पकडली. भुसावळ स्थानकावर उतरल्यानंतर तो मध्यंतरी वरणगावपर्यंत पोहोचला. येथे तीन-चार दिवस तो भीक मागत होता. गुरुवारी त्याने कवाडेनगर भागातील प्रकाश जाधव व मनोहर जाधव यांच्या घरी जावून जेवण मागितले. भुकेने कासाविस आणि भांबावलेल्या चिमुरड्याला पाहून जाधव बंधूनी प्रथम त्याला जेवू घालून माहिती विचारली. तोकड्या हिंदीत उत्तर देणार्‍या चिमुरड्याने स्वत:चे नाव दीपक विनोद माहोत आणि दिल्लीजवळील अलिगड भागातील समेरा येथील असल्याचे सांगितले. यानंतर जाधव बंधूंनी रात्रभर दीपकला स्वत:च्या घरी ठेवून शुक्रवारी वरणगाव पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.

पोलिसांनी पुन्हा दीपकसोबत संवाद साधला. यानंतर तपासचक्रे फिरली. भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस सुनील काळे यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, पक्षाचे महाराष्ट्र सहसंघटन मंत्री डॉ.राजेंद्र फडके यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याशी बोलणे केले. स्वत: खडसे आणि डॉ.फडके यांनी दिल्लीमधील भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत संपर्क साधून दीपकबद्दल माहिती दिली. दीपकने सांगितलेल्या वर्णनावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या घरापर्यंत निरोप पोहोचवला. पोलिसांनी सुद्धा तुमचा चिमुरडा वरणगावमध्ये सुखरूप असल्याचे सांगितल्याने माहोत कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. याबाबत सुनील काळे यांनी जाधव बंधूंनी दाखवलेली समयसुचकता आणि माणुसकीचे कौतुक केले. शनिवारी सकाळी दीपकचा परिवार दिल्लीहून भुसावळकडे निघणार आहे. पोलिसांच्या माध्यमातून दीपक परिवाराकडे जाईल, असे ते म्हणाले.