आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर करवसुली करण्यासही नगरसेवकांची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेचे उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. पालकमंत्री एकनाथ खडसेंनी करवसुलीवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली. परंतु, थकबाकी वसूल होणे, एलबीटीची रक्कम घटणे याला नगरसेवक जबाबदार ठरू शकत नाही. करवसुलीची जबाबदारी आयुक्तांची असून त्यांनी त्यासाठी किती प्रयत्न केले, हा संशोधनाचा विषय आहे. करवसुलीत ते कमी पडत असतील तर त्यासाठीसुद्धा आम्ही मदत करायला तयार असल्याची माहिती उपमहापौर सुनील महाजन यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून पालिकेचा गाडा चालवण्यासाठी पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा झाली. या वेळी महापालिका बरखास्त करणे, हादेखील विषय झाला. यासंदर्भात उपमहापौर महाजन यांनी पालकमंत्री खडसे हे शहराच्या विकासासाठी प्रयत्न करीत असून त्यांनी करवसुलीसाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज असल्याचे व्यक्त केलेले मत योग्य आहे.

पालक या नात्याने त्यांनी महापालिकेला आर्थिक अडचणीतून बाहेर निघण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचे स्वागत आहे. परंतु, मनपाची आर्थिक स्थिती ही आज निर्माण झालेली नाही.

अनुदानात जळगाव पडले मागे
शेजारचेधुळे शहर हे जळगावच्या तुलनेत औद्योगिक व्यापार क्षेत्रात मागे आहे; असे असतानाही एलबीटीच्या बदल्यात धुळे मनपाला एलबीटी बंदनंतर पाच कोटी ७० लाख मिळणार आहेत. परंतु, ज्या जळगावातून इतर जिल्ह्यांत मालाची निर्यात होते. तसेच मोठी एमआयडीसी असतानाही केवळ पाच कोटी ७९ लाख रुपयेच मिळणार आहेत. यावरून पालिका प्रशासन किती प्रयत्न करतेय, हे स्पष्टपणे दिसते.

आयुक्तांनी किती प्रयत्न केले?
मोठ्याप्रमाणात कराची थकबाकी वाढली आहे; परंतु, आयुक्तांकडून त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. एलबीटीसाठी आयुक्तांनी वरिष्ठ पातळीवर किती वेळा पत्रव्यवहार करून तपासणीची परवानगी घेतली? कितीवेळा व्यापाऱ्यांशी चर्चा केली? करवसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या किती बैठका घेतल्या? याचीही माहिती उघड व्हायला हवी. करवसुली होणे याला लोकप्रतिनिधी जबाबदार नाहीत. जर प्रशासन कमी पडत असेल तर त्यासाठीदेखील नगरसेवक प्रयत्न करायला तयार आहेत, अशीही उपमहापौर महाजन यांनी तयारी दाखवली आहे.