आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेठमलानींच्या मदतीने नरेंद्र मोदींना भेटलो : आ.गोटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - खासदार राम जेठमलानी यांच्या मदतीने नरेंद्र मोदी यांना भेटलो, असे सांगत धुळे लोकसभा उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण करीत अनिल गोटे यांनी महायुतीत जाण्याच्या मुद्दय़ाचे सर्मथन केले. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग आणि सफारी गार्डनचा प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीच मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना, भाजप, रिपाइं तसेच स्वाभिमानी संघटनेच्या जम्बो महायुतीच्या बीड येथे झालेल्या सभेच्या व्यासपीठावर आमदार अनिल गोटे यांनी धडक दिली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे त्यांची उमेदवारी राहील, अशी चर्चा सुरू झाली. त्या मुद्दय़ावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी अनिल गोटे यांनी पत्रपरिषद घेतली. या वेळी त्यांनी भाजपतर्फे धुळे मतदारसंघात उमेदवारी करणार असल्याचे मान्यही केले नाही अथवा त्याचे खंडनही केले नाही. मात्र, रा. स्व. संघाच्या भूमिकेशी निष्ठा असलेल्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेत आपल्याला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. आपण पूर्वार्शमीचा संघीय व जनसंघीय विचारांचे असल्याची बाबही त्यांनी आवर्जून सांगितली.

मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग हा धुळे लोकसभा क्षेत्रात विकासाची संधी निर्माण करणार आहे. या रेल्वेमार्गाच्या माध्यमातून जवळपास दोन लाख बेरोजगारांना रोजगार मिळेल. या रेल्वेमार्गाला केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्याचे केवळ भूमिपूजन व्हायचे आहे. राज्यातील आघाडी सरकार हे काम करेल, असे वाटत होते. मात्र, गोटेंना श्रेय मिळू नये, यासाठी सगळ्यांनी यात खो घातला. धुळे शहरासाठी रेल्वेमार्ग व सफारी गार्डनचे काम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. महायुतीच्या नेत्यांनी ही दोन्ही कामे करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मनमाड- इंदूर कामाची भूमिका नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली. खा. राम जेठमलानी यांच्या माध्यमातून मोदी यांची दि. 20 ऑक्टोबर 2013 रोजी भेट घेतली होती. तेव्हापासूनच महायुतीशी जोडलो गेलो.

भाजपच्या उमेदवारीवर मल्हारबागेत चर्चा
धुळे लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर मल्हारबागेत मंथन व्हायला लागले आहे. आमदार अनिल गोटे यांची मल्हारबाग गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहे. बुधवारी मल्हारबागेत डॉ.सुभाष भामरे व आ. अनिल गोटे यांच्यात चर्चा झाली. या वेळी एकमेकांना मदत करण्याची भूमिका दोघांनी घेतल्याचे वृत्त आहे. लोकसभेची उमेदवारी कुणालाही मिळो. त्याला मदत करण्यावर डॉ. भामरे व आ. गोटे यांचे एकमत झाले. विशेष बाब म्हणजे विधानसभेसाठीसुद्धा हे एकमत कायम राहणार आहे. लोकसभेसाठी मदत करताना दोघांपैकी ज्याला विधानसभा लढवायची असेल त्यालाही मदत करावी, अशी चर्चा दोघांमध्ये झाली. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील नेरकरही होते. डॉ. भामरे किंवा आ. गोटे यांच्यापैकीच उमेदवारी मिळेल, असे वातावरण आहे. महायुतीचे कामकाजही तशाच पद्धतीने होईल, अशा रीतीने पावले टाकली जात आहेत. मल्हारबागेतील भेटी राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाच्या ठरत आहेत.