आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार महाजन यांच्या नेतृत्वाखाली काढण्‍यात आलेल्या मोर्चाला गालबोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर (जि. जळगाव) - वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चाला मंगळवारी जामनेरमध्ये गालबोट लागले. आंदोलक कायर्कर्ते व शेतक-यांनी दगडफेक केल्याने संतप्त पोलिसांनीही त्यांना लाठीमाराने प्रत्युत्तर दिले. या घटनेत 15 ते 20 कार्यकर्ते जखमी झाले.
भारनियमन बंद करा, वाढीव बिले रद्द करा आदी मागण्यांसाठी भाजपतर्फे मंगळवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाड्या, ट्रॅक्टर्ससह असंख्य कार्यकर्ते, शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. वीज कंपनीच्या कार्यालयासमोर मोर्चा आला असता अधिका-यांना निवेदन देण्यासाठी बाहेर बोलावण्यात आले. मात्र मोठा जमाव असल्याने भीतीपोटी अधिकारी बाहेर आले नाहीत. या प्रकारामुळे संतापलेले कार्यकर्ते वीज कंपनीच्या कार्यालयात घुसले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला असता जमावानेही त्यांच्या दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना चोप दिला. या घटनेत 15 ते 20 कार्यकर्ते जखमी झाले.
आंदोलकांची धरपकड
आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी आमदार महाजन व इतर पदाधिका-यांनी प्रयत्न केले, मात्र जमाव शांत होण्याच्या मन:स्थितीत नव्हता. काही कार्यकर्त्यांनी महाजन यांना सुरक्षित स्थळी नेले. खासदार हरिभाऊ जावळे यांनीही जीव मुठीत धरून पळ काढला. पोलिसांनी अखेर अतिरिक्त फौजफाटा मागवून दगडफेक करणा-या आंदोलकांना पिटाळून लावले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत धरपकड सुरू होती.