आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घोटाळा: आमदार सुरेश जैन सहा महिन्यांनी तुरुंगाबाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी, आमदार सुरेश जैन सोमवारी सहा महिन्यांनी तुरुंगाबाहेर आले. धुळे न्यायालयाने त्यांची सोळा दिवसांसाठी पॅरोलवर सुटका केली.
16 जानेवारीपासून धुळे कारागृहात असलेल्या जैन यांना गेल्या आठवड्यात धुळे विशेष न्यायालयाने 21 जुलै ते 6 आॅगस्टपर्यंत वैद्यकीय रजा मंजूर केली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी ठीक 8.45 वाजता ते कारागृहाबाहेर पडले. त्यानंतर कारागृहाच्या आवारात असलेल्या उजव्या गल्लीत ते वळले. या ठिकाणी चंदेरी रंगाची कार सकाळपासून उभी होती.
प्रवेशद्वारापासून कारपर्यंत अवघ्या तीन मिनिटांत पोहोचल्यावर सकाळी ठीक 8.48 वाजता जैन यांची कार जेलरोड, धुळे तहसील कार्यालयमार्गे रवाना झाली. तत्पूर्वी 8.30 वाजता धुळे पोलिस मुख्यालयातून दोन कर्मचारी त्यांच्या सुरक्षा व बंदोबस्तासाठी कारागृहात आले होते.

वाणी आले गेटवर
जैन यांच्याप्रमाणेच पांढरा कुर्ता, पायजमा परिधान केलेले जगन्नाथ वाणी हे कारागृहाच्या गेटपर्यंत त्यांच्यासोबत आले. कारागृहातून बाहेर पडताना वाणी हे छोट्याशा दारातून जैन यांना काही सांगत होते, तर जैन यांनी समोर माध्यम प्रतिनिधींना पाहून मागे न वळता लागलीच उजवीकडे वळण घेतले. त्यामुळे बहुधा वाणी यांचे बोल त्यांच्या कानावर गेले नसावेत.