आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश जैन जळगावच्या जेलमध्ये; कोर्टाचा निर्णय होण्यापूर्वी हलविल्याने आश्चर्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळा प्रकरणातील आरोपी आमदार सुरेश जैन यांना अखेर जळगाव कारागृहात हलविण्यात आले आहे. याच संदर्भात 12 नोव्हेंबरला जळगाव न्यायालयात निर्णय होणार होता. त्या आधीच मुंबईतील ऑर्थररोड कारागृहाने त्यांना जळगावला हलविण्याचे पाऊल उचलले. आमदार जैन यांचे जळगावला येणे चर्चेचा विषय बनला आहे.

घरकुल घोटाळाप्रकरणी अटक केल्यानंतर जैन यांनी स्थानिक न्यायालयासह उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वारंवार अर्ज, विनंत्या केल्या. मात्र अनेकदा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर जैन यांनी आपल्याला जळगावला हलविण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. त्यावर सुनावणी होऊन 12 नोव्हेंबरला न्यायालय निर्णय देणार होते. त्या आधीच 4 नोव्हेंबरला त्यांना मुंबईतील रुग्णालय प्रशासनाने ‘डिस्चार्ज’ दिला. त्यांची प्रकृती ठीक असून रुग्णालयीन उपचारांची गरज नसल्याचे रुग्णालयाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

सुरेश जैन यांना अशा कारागृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, ज्या कारागृहालगत हृदयावरील सर्व प्रकारच्या उपचारांची सोय असलेले रुग्णालय असेल. त्यामुळे त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून ऑर्थररोड कारागृहात आणि तेथून सेंट जॉर्जेस् रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची रवानगी जळगावला करण्यासाठी न्यायालयाचीच परवानगी लागेल, असे समजले जात होते. मात्र, न्यायालयाचा आदेश होण्याआधीच जैन जळगाव कारागृहात दाखल झाले आहेत. वकिलांकडूनही त्याबाबत आर्श्चय व्यक्त करण्यात येत असले तरी सुरेश जैन आता बरे झाले असल्यामुळे त्यांना कुठे ठेवायचे ही बाब तुरुंग प्रशासनाच्या अखत्यारीत येते, असे सांगण्यात आले.

जैन यांचा अर्ज अन् संमती
आपल्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यास न्यायालयीन कामकाजाच्या सोयीसाठी जळगावच्या तुरुंगात रवानगी करावी, अशी विनंती करणारा अर्ज आमदार सुरेश जैन यांनी ऑर्थररोड कारागृह अधीक्षकांकडे केला होता. तो संमत करण्यात आल्यामुळे त्यांची रुग्णालयातून थेट जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली, असे ऑर्थररोड कारागृहाच्या अधीक्षक स्वाती साठय़े यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'पोलिस कोठडी ते तुरुंग.. व्हाया रुग्णालय'