आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचा जिल्हा मेळावा: ‘चले जाव’ नार्‍याने हादरले प्रस्थापित!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल, पतसंस्था, विमानतळ, गणवेश, सिंचनासह अनेक घोटाळे करून प्रस्थापितांनी ‘घोटाळ्यांचा जिल्हा’ अशी जळगावची बदनाम ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्याचे नाव बदनाम करणार्‍या अशा प्रस्थापित नेत्यांविरुद्ध प्रत्येक तालुक्यात ‘चले जाव’ची मोहीम राबविण्याची घोषणा प्रवीण दरेकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहातील मनसेच्या जिल्हा मेळाव्यात केली.

जळगावातील हा मेळावा क्रांतिकारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करून दरेकर म्हणाले की, जिल्ह्यातील भ्रष्टाचार व घोटाळ्याला जनता कंटाळली आहे. सर्व पक्षांच्या वाईट अनुभवानंतर आता मनसेच परिवर्तन करू शकते, अशी सर्वसामान्यांना आशा आहे. धुळ्याची दंगलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख झाली आहे. तर आशिया खंडातील पहिली 17 मजली महापालिका म्हणून ओळख असलेल्या जळगावला प्रस्थापितांच्या घोटाळ्यांनी कलंकीत केलेय. चुकत असलेल्यांवर लक्ष ठेवण्याचे काम विरोधी पक्षाचे असते; मात्र जळगावात भाजप आणि शिवसेनेने ती भूमिका योग्यरीत्या पार पाडलेली दिसत नाही.

व्यासपीठावर आमदार प्रकाश भोईर, जिल्हा संपर्क अध्यक्ष विनय भोईटे व गजानन राणे, जिल्हा संघटक राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस किरण शेलार, जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे, जमील देशपांडे, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी डोलारे, दीपा पाटील, मनसे एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष डी.एम.पाटील, पप्पू राजपूत आदी उपस्थित होते.

‘जलगाव’ नव्हे ‘जेलगाव’
आमदार सुरेश जैन, संतोष चौधरी, माजी महापौर प्रदीप रायसोनी, पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार मनीष जैन, आमदार दिलीप वाघ, गुलाबराव पाटील, सदाशिव ढेकळे, अशोक सपकाळे यातील प्रत्येक जण कुठल्याना कुठल्या घोटाळ्यात गुंतला आहे. प्रस्थापित लोकप्रतिनिधी सध्या जेलमध्ये असल्याने ‘जलगाव’चे नाव ‘जेलगाव’ झाले आहे.

सत्कारात तलवारींची चकाकी
मान्यवरांचा सत्कार करताना आयोजकांनी दरेकर, भोईर, भोईटे, राणे यांना शाल-र्शीफळासोबत तलवारी दिल्या. प्रस्थापितांच्या तलवारी म्यान झाल्याने आता मनसेच्या तलवारी बाहेर निघाल्याची कोटी जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी केली. त्यानंतर दरेकरांसह सर्वांनीच तलवारी उंचावून हे आव्हान पेलण्यास तयार राहा, असे आवाहन केले.

जबरदस्त वातावरण निर्मिती
मेळाव्यापूर्वी प्रभात चौक ते सभा मंडपापर्यंत रॅली काढण्यात आली. पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे या रॅलीत सहभागी झाले. उत्कृष्ट नियोजन आणि शिस्तबद्ध रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मेळाव्याच्या वातवरण निर्मितीसाठी डीएसपी चौकातील अजिंठा विर्शामगृह ते आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, नेहरू चौकमार्गे रेल्वे स्थानकापर्यंत पाच किलोमीटरचा अखंड पक्षध्वज लावण्यात आला होता. तोही शहरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेचा विषय ठरला.

पदाधिकार्‍यांचीही फटकेबाजी
मेळाव्यातील भाषणात पदाधिकार्‍यांनीही फटकेबाजी केली. गजानन राणे यांनी जळगावातील नेत्यांनी जनतेच्या पैशांतून स्वत:च्या नावाने सभागृह बांधून घेतल्याचे सांगितले. किरण शेलार यांनी राज ठाकरे यांचा विचार घरोघरी पोहचविण्यासाठी जीव ओतून काम करण्याचे आवाहन केले. जमील देशपांडे यांनी विरोधी पक्षनेते जिल्ह्याबद्दल बोलत नाही आणि पालकमंत्री ‘फलकमंत्री’ म्हणून वावरत असल्याचा टोला लगावला. ललित कोल्हे यांनी महापालिकेवर मनसेचा झेंडा रोवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा दृढनिश्चय जाहीर केला. प्राची कुलकर्णी यांनी, ही पैशांची गर्दी नसल्याने इतरांच्या मनात धडकी भरली असल्याचे सांगितले.

अँड.बाविस्कर गेले कुणीकडे?
राज ठाकरे यांची 7 फेब्रुवारीला प्रथमच जाहीर सभा होणार आहे. मेळाव्याने याबाबतची उत्सुकता जागी झाली आहे. पक्षाचे दोन आमदार मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच जिल्हा दौर्‍यावर होते. मात्र, प्रदेश सरचिटणीस अँड.जयप्रकाश बाविस्कर मेळाव्यात दिसले नाहीत. राज्यातील संघटनेच्या महत्त्वाच्या जबाबदार्‍या पेलणारे बाविस्कर मेळाव्यात न दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू होती.

अँड.बाविस्कर उस्मानाबादेत
मेळाव्यात अँड.बाविस्करांच्या अनुपस्थितीबाबत ‘दिव्य मराठी’ने थेट त्यांच्याकडेच विचारणा केली. पक्ष संघटनेसाठी तीन दिवसांपासून आमदार बाळा नांदगावकर यांच्यासह लातूर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यात दौर्‍यावर असल्याची माहिती त्यांनी दिली. बाविस्कर 23 ते 25 जानेवारीपर्यंत कोकण दौरा करणार आहेत.

मनसे आमदारांची विविध मान्यवरांशी चर्चा
जळगाव दौर्‍यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश भोईर यांनी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केली.
राजकीय हेतूने नव्हे तर संबंधित क्षेत्रातील अडीअडचणी जाणून घेत त्या विधानसभेत मांडण्याचा या बैठकीचा उद्देश होता. अजिंठा विर्शामगृहात झालेल्या या चर्चासत्रात खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, हॉटेलक्षेत्राशी संबंधित असलेले महेंद्राचे संचालक तेजा महेंद्रा, न्युरोसर्जन डॉ. संजीव हुजुरबाजार, जिल्हा ज्वेलर्स संघटनेचे चेअरमन गौतम जैन, शहराध्यक्ष अजय ललवाणी, स्वरुप लुंकड, महिला संघटनेच्या पदाधिकारी शांता वाणी, निधी स्वयंसेवी संस्थेच्या वैशाली विसपुते, सामाजिक क्षेत्रातील सतीश भोळे, कायदा क्षेत्रातील अँड.विश्वास भोसले, पीक संरक्षण संस्थेचे चंदन कोल्हे, माजी शिक्षणाधिकारी डी. डी. पाटील सहभागी झाले होते. या चर्चा सत्रास पक्षाचे संपर्क अध्यक्ष विनय भोईटे, गजानन राणे, जिल्हाध्यक्ष ललीत कोल्हे, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष विनोद शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन नेमाडे यांनी केले.