आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट तयार- प्रवीण दरेकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राज्यात आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तसेच पदाधिकारी राज्यभर दौरे करीत आहेत. निवडणुकींपूर्वी मनसे राज्याच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार केली असून ती लवकरच जाहीर करणार आहे, असे मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. ते शुक्रवारी मनसेच्या मेळाव्यासाठी शहरात आले होते. त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार प्रकाश भोईर, संपर्क प्रमुख विनय भोईटे, जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे, डी.एम.पाटील, किरण शेलार, अनिल कचरे, गजानन राणे आदी उपस्थित होते.

आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडलेले राजकीय मुद्दे
> मोठय़ा शहरानंतर आता मनसे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या उद्देशाने प्रयत्नशील आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून तरुण उमेदवार, कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पक्ष वाढविण्याचे काम सुरू झाले आहे.

> पक्षात महिला उमेदवारांचा सध्या तुटवडा असला तरी काम करणार्‍या कर्तृत्ववान महिलांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. महिलांनी पक्षात यावे या साठी आगामी काळात राज्य पातळीवर महिला आणि युवतींसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

> इतर पक्षातील पदाधिकार्‍यांना मनसेत प्रवेश देण्यासाठी पक्ष इच्छुक नाही. मात्र इतर पक्षातील चांगले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी पक्षात येत असल्यास त्यांचे स्वागत करण्यात येईल. उमेदवारी देताना मात्र मनसेने सुरू केलेल्या परीक्षा आणि मुलाखतींचा पॅटर्न कायम राहील.

> राज्यात भाजप, शिवसेना विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या गटबाजीमुळे बेरोजगारी, वीज, पाणी, दुष्काळ या समस्यांवर सरकारला कोंडीत पकडले जात नाही. विरोधीपक्ष आक्रमक नसल्यामुळे राज्य विकासकामांसह प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे. मनसेला हीच कामे करायची आहेत.

> मनसेकडे युवकांचा ओढा जास्त आहे. त्यामुळे युवा सेनेने युवकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्याचे ध्येय घेतले आहे. मात्र खरी परिस्थिती पाहिली तर मनसे हा युवकांसाठी योग्य पर्याय आहे. कारण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे युवकांना जास्त संधी देत आहेत.

> आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार्‍या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. तालुका, जिल्हा कार्यकारिणी आणि पक्षप्रमुख यांच्यात साखळी निर्माण केली जात आहे.