आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धुळे - शहराजवळून जाणार्या मुंबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर लळिंग शिवारात टोलनाके उभारून इरकॉन कंपनीतर्फे टोल वसुली होत आहे. मात्र ही टोल वसुली अन्यायकारक व बेकायदेशीर असून त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शनिवारी सकाळी अकरा वाजता टोलनाक्यावर ‘टोल बंद’ आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी वसुली सेंटर बंद केले. त्यामुळे अनेक वाहनधारक टोल न भरताच महामार्गावरून निघून गेल्याचे चित्र होते.
मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे ते पिंपळगावपर्यंत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम इरकॉन सोमा टोलवे कंपनीतर्फे करण्यात आले आहे. हे काम बीओटी तत्त्वावर असल्याने काम पूर्ण झाल्यानंतर वाहनधारकांकडून टोल वसुली सुरू करण्यात येत आहे. मात्र, या टोलनाक्यावर होणारी टोल वसुली अन्यायकारक असल्याचा आरोप मनसेतर्फे करण्यात आला आहे. महामार्ग कायद्यानुसार जेवढय़ा रस्त्याचा वाहनधारक वापर करतात, तेवढय़ाच रस्त्याचा पथकर वसूल करणे बंधनकारक आहे. ही स्थिती असताना टोलनाक्यावर अतिरिक्त टोल वसुली करण्यात येत आहे. ही वसुली बंद करण्यात यावी, धुळे शहरापासून रोकडोबा हनुमान मंदिर व आर्वी हे अंतर कमी असतानादेखील वाहनधारकांकडून 118 किलोमीटरचा पथकर वसूल करण्यात येतो. कोणत्याही वाहनाला परतीची पावती देण्यात येत नाही. ती देण्यात यावी, पुणे ते मुंबई महामार्गाप्रमाणे टप्प्याटप्प्याने पथकर आकारणी करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, स्थानिक वाहनांना पथकरातून सूट द्यावी, कर्मचार्यांसाठी आवश्यक तेवढे सुलभ शौचालये उभारण्यात यावीत, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली होती.
त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने शनिवारी पक्षाच्या रस्ते व आस्थापना सुविधा विभागातर्फे टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. या वेळी टोल वसुली करणार्या कंपनीच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. योगेश चिले, रावसाहेब कदम, डी.एम. पाटील, किरण बागुल, किरण नगराळे, प्रमोद अहिरराव, अजित राजपूत, अनिल शिरसाठ, संदीप जडे, अनिल शिंदे, किशोर गिंदोडिया, नंदराज पाटील, प्राची कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.