आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईला मोबाइलवरील ‘तीनपत्ती’ गेमचे वेड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तरुणांमध्ये स्मार्टफोनचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला असून अत्याधुनिक मोबाइलच्या माध्यमातून वापरले जाणारे वेगवेगळे अँप्स आणि गेम्स तरुणांना शिकार बनवत चालले आहेत. अँड्रॉइड, विंडोज, मॅक या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित मोबाइलचा वापर बहुतांश तरुण फेसबुक, व्हॉट्सअँपसाठी करतात. मात्र सध्या ‘तीनपत्ती’ या जुगाराशी साधम्र्य असणार्‍या खेळाने तरुणांना वेड लावले आहे. हा गेम खेळणारे तरुण आपला बहुमूल्य वेळ वाया घालवत असल्याने पालकही चिंतित झाले आहेत.

गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध असलेला ‘तीनपत्ती’ हा गेम सध्या धुमाकूळ घालत आहे. ज्या तरुणांकडे स्मार्ट फोन आहे तो वेगवेगळ्या अँप्सचा वापर करतो. याद्वारे मोबाइलवर वेगवेगळे गेम्स डाऊनलोड करून ते खेळणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात तरुणांसह मोठेही मागे नाहीत. स्मार्टफोन वापरणारे तरुण या गेम्सच्या आहारी गेले आहेत. हा गेम डाऊनलोड केल्यानंतर प्रारंभी दहा हजार ‘चिप्स’ मिळतात. यानंतर तुम्ही जसजसे जिंकत जाल तसतशा ‘चिप्स’ वाढत जातात आणि हरल्यानंतर पुन्हा खेळण्यासाठी मार्केटमधून ‘चिप्स’ विकत घेतल्या जातात. यात पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टींचे भान खेळणार्‍यास राहत नाही. रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत मोबाइलवर तीनपत्ती गेम सुरू असतो. तरुण, व्यावसायिक, वयस्क मंडळींना या खेळाने भुरळ घातली आहे. अशा ऑनलाइन खेळांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा खेळ एक प्रकारचा जुगार असून यात वेळ आणि पैशाचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होत आहे. असे गेम्स खेळण्यासाठी दिवस-रात्रीचे भान नसल्यामुळे याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे अशा अँप्स आणि गेमवर बंदी घालावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

जास्त वापर धोकादायकच
मोबाइलवर जास्त वेळ इंटरनेट वापरणे हे डोळ्यांसाठी धोकादायक आहे. तरुणांचा याकडे वाढता कल चिंतेचा विषय ठरत आहे. पालकांनी वेळीच लक्ष देऊन मुलांना आवर घालावा. संजय शिंपी, शिक्षक

1 कोटी ‘चिप्स’ची किंमत 1500 रुपये
तीनपत्ती हा गेम खेळण्यासाठी चिप्सची गरज असते. गेम खेळण्यासाठी सुरुवातीस 10 हजार पॉइंट्स मोफत मिळतात. नंतर पुढे मोठी चाल खेळण्यासाठी लाखापासून ते एक कोटीपर्यंत चिप्सची गरज पडते. हे पॉइंट्स त्याच दिवशी ऑनलाइन मिळू शकत नाहीत. त्यामुळे या गेमची चटक लागलेले तरुण प्रायव्हेट टेबलद्वारे 1200 ते 1500 रुपये रोख देऊन चिप्स खरेदी करतात. अशा चिप्स शहरातील अनेक तरुण विकतात. यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून हा जुगाराचा प्रकार आहे.