आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅल करून अाॅफर्सच्या नावाने फसवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मोबाइलवर कॉल करून वेगवेगळ्या आॅफर्स देऊन सामान्यांची लूट सुरू असल्याचे प्रकार सध्या घडत आहेत. यात विशेष म्हणजे मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, सोन्याचे दागिने, अशा वस्तू अगदी स्वस्तात मिळत असल्याच्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

सायबर क्राइम प्रकारात मोडणाऱ्या या गुन्ह्यात अनेक जण साखळी पद्धतीने काम करीत असल्याचे जाणवते. मोबाइल कंपनी, सोने व्यावसायिकांच्या नावाने फोन करून तसेच आपण संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याचे भासवले जाते. आपणास कमी किमतीत वस्तू उपलब्ध करून देत असल्याचे फोनवरून सांगितले जाते. त्यानंतर संबंधिताचे नाव, पत्ता घेऊन त्यांना पोस्ट अाॅफिसात आपले पार्सल पाठवू, असे सांगितले जाते. पंधरा ते वीस दिवसानंतर ठरल्याप्रमाणे पार्सल पोस्ट आॅफिसात पोहोचते खरे, पण त्यात काय असेल? हे कुणीच सांगू शकत नाही. पार्सलसोबत दिलेल्या अकाउंट नंबरवर पैसे भरल्याशिवाय पार्सल मिळत नाही. त्यामुळे हा धोका पत्करण्याची तयार ठेवावी लागते. ‘दिव्य मराठी’ला मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत तीन जणांसोबत असा प्रकार झाला आहे. त्यापैकी दोघांनी पार्सल सोडवलेले नाही; तर शनिपेठमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाला मोबाइलच्या नावावर साबण आल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात अद्याप पोलिसांत तक्रार दाखल नाही.

वेगवेगळ्या व्यक्तींकडून फोन
आपल्याला मिळालेली आॅफर खरी आहे, हे भासवण्यासाठी भामट्यांकडून वेगवेगळ्या क्रमांकाने वेगवेगळ्या व्यक्तींकडून फोन केले जातात. सर्व जण अगदी कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या युवक-युवतींप्रमाणेच संवाद साधतात. हे कॉल आपली आवड निश्चितीसाठी असल्याचे भासवले जाते. त्यामुळे नागरिकांना संशयही येत नसल्याने फसवणूक होते.

५-६ वेळेस पाठपुरावा
याप्रकारात एकदा कुणी नाव पत्ता दिला, तर त्याची वस्तू बुक करून घेतात. पार्सल हातात मिळाल्यानंतर पैसे देण्याची अट असते. त्यामुळे आपली फसवणूक होतेय, असे कुणालाही वाटत नाही. संबंधित भामटे १५ दिवसांत पाच ते सहा वेळा फोन करून पाठपुरावाही करतात. वस्तू पोस्ट आॅफिसला पाठवल्यानंतर संबंधित पार्सल क्रमांकही एसएमएस केला जातो. यानंतर मात्र संबंधित मोबाइल क्रमांक बंद असतात. म्हणजेच पार्सल सोडवण्याची जबाबदारी ग्राहकावर सोडल्यानंतर भामटे केवळ अकाउंटवर पैसे येण्याची वाट पाहतात. त्या पार्सलमध्ये बुक केलेली वस्तू नसली तर, फसवणूक होईल, हे निश्चित असते.

{ मोबाइलवर ऑफर्ससंदर्भात आलेल्या व्यक्तींना दाद देऊ नका
{ कोणत्याही प्रकारची खासगी माहिती (नाव, पत्ता, बँक अकाउंट नंबर) फोनवरून देऊ नका
{ शक्यतो असे फोन कॉल्स रिसिव्ह करू नका
{ ऑनलाइन शॉपिंग करतानाही संबंधित कंपन्यांकडून पक्क्या बिलाची मागणी करा.