आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल टॉवरमुळे धोक्याच्या ‘लहरी’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहरातील रहिवासी क्षेत्रात झपाट्याने वाढणा-या मोबाइल टॉवरच्या जाळ्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शहरवासी मोबाइल टॉवरपासून निघणा-या विकिरणांच्या तोंडी येत असून यामुळे अनेकांना नानाविध प्रकारचे विकार होण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत मात्र सर्वांनीच कानावर हात आणि डोळ्यावर पट्टी ठेवली असल्याचे दिसते.
वाढत्या जागतीकिकरणात एकेकाळी प्रतिष्ठेचा मानला जाणारा मोबाइल आता अगदी सामान्यांचाही उत्सुकतेचा विषय राहिलेला नाही. सर्व ग्राहकांना चांगली सेवा मिळावी. या स्पर्धेत जागतिक दर्जाच्या मोबाइल कंपन्यांनी खेड्यापाड्यांवर टॉवरची उभारणी केली आहे. एकट्या भुसावळ शहरात 30 पेक्षा जास्त मोबाइल टॉवर आहेत. तर भुसावळ तालुक्यात 46 टॉवर आहेत. विशेष म्हणजे शहरातील रहिवासी वस्त्यांत 11 टॉवरची उभारणी झाली आहे. शहराच्या एक लाख 87 हजार लोकसंख्येसाठी आणि शहराच्या चार ते पाच किलोमीटरच्या परिघासाठी केवळ दोन उंच टॉवर पुरेशे आहेत. असे असतानाही केवळ खासगी मोबाइल कंपन्यांच्या स्पर्धेतून दर महिन्यास एका नवीन टॉवरचा जन्म होत आहे. परिणामी वाटेल तेथे मोबाइल टॉवर उभारले जात आहेत. रहिवास क्षेत्रात चक्क 11 मोबाइल टॉवर आहेत. शहरातील हॉटेल रसोईजवळ, पुरूषोत्तमनगर, मॉर्डन रोड, गुरद्वारासमोर, प्रोफेसर कॉलनी, नवशक्ती आर्केड आदींसह अन्य रहिवासी भागात 11 मोबाइल टॉवर उभारली गेली आहेत. यासह भारतीय दूरसंचार विभागाचे दोन टॉवर रेल्वे डीआरएम कार्यालयाजवळ आहेत. यासह सर्वच पोलिस स्थानकात वायरलेस सर्व्हीस टॉवर, रेल्वेचे स्वतंत्र टॉवर उभे आहेत. गच्चीवर मोबाइल टॉवर लावण्यासाठी घर किंवा गच्ची उपलब्ध करून देणा-यांना महिन्याकाठी दहा ते 13 हजार रुपयांचे मासिक उत्पन्न मिळते. ताजा पैसा मिळत असल्याने मोबाइल टॉवरमुळे भविष्यात आपण किंवा आपल्या कुटुंबीयांना काय नुकसान होऊ शकते याकडे मात्र कानाडोळा करण्यात येतो. मोबाइल टॉवर असलेल्या घरात एक मंद आवाज सतत सुरू असतो. या घरात प्रवेश केल्यावर नवीन व्यक्तीस त्याची जाणीव होते. मात्र, सरावाचा भाग झाल्याने गच्ची मोबाइल टॉवरसाठी भाड्याने देणा-यांना याची जाणीव होत नाही. जास्तवेळ मोबाइल टॉवरच्या सानिध्यात राहिल्यास मात्र कालांतराने किडनी, हृदय किंवा शरीराच्या वेगवेगळ््या अवयवांवर परिणाम होतो, याबाबत जनजागृतीची गरज आहे.
स्पर्धा जीवघेणी - शहरात एअरटेल, आयडिया, वोडाफोन, बीएसएनएल, टाटा इंडिकॉम यासह सर्वच मोबाइल कंपन्यांचे टॉवर आहेत. ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या स्पर्धेतून फ्रिक्वेंसी वाढविली जाते. नियमानुसार 0. 4 मिलीवॉट प्रती वर्ग सेंटीमीटर रेंज असावी. मात्र, ती कधी 4. 6 मिलीवॉट होते. ढगाळ वातावरणात रेंजचा प्रश्न निर्माण झाल्यास ती 6 मिलीवॉट पेक्षा अधिक धोके दायक असते. मात्र याकडे दुर्लक्षच होते.
मोजण्यासाठी यंत्रणाच नाही - जिल्ह्यातील दुस-या क्रमांकाचे मोठे शहर भुसावळात मोबाइल टॉवर उभारले जात आहेत. यातून दररोज हजारो ग्राहकांना मोबाइलची सेवा पुरविली जाते. अनेक ग्राहक मोबाइल वापरतात. मात्र, त्यांच्या परिणामांची जाणीव कोणालाही नाही. ध्वनीलहरी किती प्रमाणात निघतात आणि त्याचा मानवी जीवावर किंवा पशुपक्ष्यांवर काय परिणाम होतो ? याकडेही कोणाचे लक्ष नाही. प्रदूषण नियंत्रण बोर्ड किंवा कोणत्याही खासगी संस्थेचे फ्रिक्वेंसी मापक यंत्र शहरात नाही. यामुळे मोबाइल कंपन्यांनी किती प्रमाणात फ्रिक्वेंसी वाढविली याची पुसटशीही कल्पना ग्राहक किंवा पर्यावरणवाद्यांना माहिती नाही.
टॉवरमुळे होणारे विकार - मोबाइल टॉवरमधून निघणा-या किरणांमुळे मानवी शरीरावर परिणाम होतो. मोबाइल ध्वनीलहरींच्या अधिक संपर्कास आल्यास कॅन्सर, दृष्टी कमी होणे, चिडचिडेपणा, नकारात्मक विचार, सतत डोके दुखणे, शारीरिक कमजोरी, थकवा येणे, अंगाला खाज येणे, जळजळ होणे, लहान मुलांत विकृ ती निर्माण होते. रेडिएशनचे विकार दीर्घकालिन आहेत. याचा परिणाम शरीरावर तत्काळ होत नाही. यामुळे आपल्यावर काही परिणाम होतो का ? याचेही भान मोबाइल टॉवरखाली रहिवास करणा-यांना नसते.
पालिका खरोखर नियम पाळते काय? दोष आहे कुणाचा? - नगरपालिका क्षेत्रात मोबाइल टॉवर उभारणीसाठी पालिकेचे मुख्याधिकारी आणि नगररचना विभागाची परवानगी आवश्यक असते. डेव्हल्पमेंट कंट्रोल नियमानुसार ती जागा टॉवरच्या मालकाची असावी. अन्यथा जागा मालकाने, जागा संंबंधित कंपनीस वापरासाठी देत असल्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. टॉवरच्या उंचीच्या तुलनेत जमिनीचे क्षेत्रफळ आणि बांधकाम करणे महत्त्वाचे असते. टॉवर उभारणीसाठी परिसरातील रहिवाश्यांची नाहरकत महत्त्वाची असते. मात्र, भुसावळात या नियमांची पायमल्ली होत असल्याची पर्यावरणवाद्यांची ओरड आहे.
मापदंडांना धाब्यावर बसवून टॉवर उभारणी - मोबाइल टॉवरपासून किती फ्रिक्वेंसी सोडण्यात यावी यासाठी मापदंड आहेत. अणू संशोधन केंद्राने त्याचे प्रमाणही सांगितले आहे. मात्र, याकडे सर्वच खासगी कंपन्या दुर्लक्ष करतात. रहिवास असलेल्या जागेवर मोबाइल टॉवर नसणे हा उत्तम पर्याय आहे. सतत येणा-या ध्वनीलहरींमुळे पक्षांच्या प्रजनन क्रियेवर परिणाम झाला आहे. मधमाशी आणि फुलपाखरांच्या संख्येतही मोठ्या संख्येने घट होत आहे. हे थांबलेच पाहिजे. - निमजी जलगाववाला, पक्षीमित्र-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते, जळगाव