आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांच्या सभांना उपस्थित श्रोत्यांना वरिष्ठ नेत्यांचे थेट मोबाइलवरूनच मार्गदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/सातारा - प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या उमेदवारांच्या सभेसाठी जाणे अशक्यप्राय होत आहे. त्यामुळे या नेत्यांनी शक्कल लढवून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास प्रारंभ केल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
भाजपच्या दोन उमेदवारांच्या सभांना एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे पोहोचू न शकल्याने त्यांनी सभास्थानी उपस्थित श्रोत्यांना थेट मोबाइलवरूनच मार्गदर्शन करीत भविष्यातील हायटेक प्रचारांची झलकच दाखवून दिली. मुंबईहून निघणा-या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने खडसे हे चाळीसगावचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या सभेला येऊ शकले नाहीत. मतदारांनी खडसे यांची तब्बल दीड तास प्रतीक्षा केली. मात्र, नंतर त्यांचा दौरा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र उपस्थित मतदारांची नाराजी टाळण्यासाठी खासदार ए. टी. पाटील यांच्या मोबाइलवर संपर्क साधून खडसे यांनी भाषण केले.

पंकजांचा संवाद
भाजपचे नवनेतृत्व पंकजा मुंडे यांची गुरुवारी साता-यात एक सभा आयोजित करण्यात आली होती. पण खराब वातावरण असल्यामुळे पंकजा यांच्या हेलिकॉप्टरला टेक ऑफची परवानगी मिळाली नाही. पण... पंकजा मुंडे यांनी सभास्थळी न जाताही मतदारांशी संवाद साधला... त्यांनी सभास्थळी उपस्थित असलेल्या महादेव जानकर यांना फोन लावला... जानेकरांनी हा फोन माइकवर धरला आणि लाऊडस्पीकरद्वारे पंकजा मुंडे यांचा आवाज मतदारांपर्यंत पोहोचवला.