चाळीसगाव - राज्यातील उद्योग गुजरातला हलवून मराठी माणसाचे हात रिकामे करण्याचे षड्यंत्र मोदी सरकारने सुरू केले आहे. यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील हिरे व्यावसायिकांना गळ घातली आहे, असा आरोप आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केला. आमदार राजीव देशमुख यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर सागरी पोलिस प्रशिक्षण केंद्र मुंबईत उभारण्याचा निर्णय यूपीए सरकारने घेतला होता; परंतु मोदी सरकारने हा निर्णय फिरवत प्रशिक्षण केंद्र गुजरातला उभारण्याचा घाट घातला, असा आरोपही पवारांनी केला. मराठा, मुस्लिम अशा अनेक समाजांना आरक्षण देऊन आघाडी सरकारने सर्व समाजाचा समतोल विकास साधला असून सिंचन घोटाळा झाला असल्याचा आरोप धांदात खोटा आहे.
आपण कृषिमंत्री असताना शेतक-यांसाठीच्या अनेक योजना राबविल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी खासदार ईश्वरलाल जैन, अरुण गुजराथी, साहेबराव पाटील, प्रमोद पाटील यांनीदेखील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विचाराचा नव्हे, खोट्या प्रचाराच्या व्यवस्थापनाचा विजय झाल्याचे गुजराथी यांनी सांगितले.
माझी सत्तेची भूक भागलीय
४७ वर्षांपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकारण केले असून आता सत्तेची भूक भागली आहे. महाराष्ट्राचे गतवैभव कायम राहण्यासाठी आता लढाई सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. हिमतीने निर्णय घेणारे नेतृत्व हवे आहे, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. चार राज्यांतील विधानसभा पोट निवडणुकीतील निकाल पाहता मोदी लाट ओसरली असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.