आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi News In Marathi, Modi Rally Issue At Nagar, Divya Marathi

‘मोदी तोफ’ आज नगरमध्ये धडाडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सावेडीतील संत निरंकारी भवनाजवळील मैदान सज्ज झाले आहे. या सभेकडे विरोधकांचेही लक्ष लागले आहे. सभेच्या ठिकाणी प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारासाठी मोदी शनिवारी (12 एप्रिल) येत आहेत. व्यासपीठाच्या मागच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर सायंकाळी सव्वाचार वाजता त्यांचे हेलिकॉफ्टर उतरेल. 4 वाजून 25 मिनिटांनी व्यासपीठावर येऊन ते भाषणाला सुरुवात करतील. 5 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे भाषण संपलेले असेल. 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांचे हेलिकॉफ्टर पुण्याच्या दिशेने प्रयाण करेल.

व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आरपीआयचे रामदास आठवले, राष्ट्रीय चिटणीस श्याम जाजू, प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, उमेदवार गांधी व शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे असतील. या सभेला शहर व जिल्ह्यातून तीन लाख लोक उपस्थित राहतील, अशी भाजपची अपेक्षा आहे.
एक हजार सुरक्षा कर्मचारी तैनात

सभेच्या ठिकाणाला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. एक हजार पोलिस कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी व कर्मचार्‍यांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. जळगाव, नाशिक जिल्ह्यातून अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला आहे. मैदानाशेजारील इमारतींचे छत ताब्यात घेण्यात आली आहेत. बाँबशोधक व श्वानपथकाने संपूर्ण मैदानाची तपासणी केली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके गुरुवारी सायंकाळपासून नगरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त गुजरात पोलिस, राज्य गुप्तवार्ता विभाग, एनएसजीची स्वतंत्र यंत्रणा तैनात असणार आहे. व्यासपीठ व जवळचा परिसरात गुजरात पोलिस व एनएसजीचे पथक तैनात असेल. मैदानाकडे येणार्‍या रस्ता रहदारीसाठी बंद ठेवण्यात येणार असून पोलिस अधीक्षकांनी तशी अधिसूचना जारी केली आहे.

महिलांसाठी स्वच्छतागृह कुठे?
सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा मैदानावर तैनात करण्यात आला आहे. अनेक महिला पोलिसांचा त्यात समावेश आहे. शुक्रवारी दिवसभर भर उन्हात त्यांना थांबावे लागले. मैदानाजवळ स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने महिला पोलिसांची मोठी गैरसोय झाली. शेवटी आसपासच्या रहिवाशांनी त्यांची अडचण दूर केली.

सभेसाठी चोख वाहनव्यवस्था
चारचाकी : यशोदानगर, शिरसाठ मळा, सपकाळ हॉस्पिटल, टेलिफोन भवन, भिंगारदिवे मळा, कोहिनूर मंगल कार्यालय, बजरंग विद्यालय. दुचाकी : पेमराज सारडा महाविद्यालयाचे मैदान, आनंद विद्यालय, विवेकानंद हायस्कूल (तारकपूर), सिव्हिल हडको (तारकपूर) व मिस्कीन मळा.