आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोक्कातून सुटलेल्या आरोपीचा धुमाकूळ; मोक्कातून सुटलेल्या आरोपीचा धुमाकूळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पैसे दिले नाही आणि मागील महिन्यात आपल्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. या दोन वेगवेगळ्या गोष्टींचा राग आल्यामुळे हरिविठ्ठलनगरात राहणार्‍या सहा जणांवर भगवान विजय वाघ (हटकर) याने चाकूने वॉर करून जखमी केले. त्यात वृद्ध महिलेचा समावेश आहे. शनिवारी दुपारी 12 आणि 1 वाजता या दोन घटना घडल्या.
रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भगवानने पोलिस ठाणे आणि सामान्य रुग्णालयातही पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच घटनेची माहिती घेण्यासाठी सामान्य रुग्णालयात आलेले हरिविठ्ठलनगरचे नगरसेवक संतोष पाटील आणि कार्यकर्त्यांना भगवानने शिवीगाळ केली. त्यामुळे सामान्य रुग्णालयातही दोन वेळा झोंबाझोंबीचा प्रकार झाला.

विनोद हरचंद कोळी (वय 31), सुरेश भाऊलाल कोळी (40) यांनी पैसे दिले नाही म्हणुन त्यांना 12 वाजता मारहाण केली. तर मागील एका तक्रारीचा राग आल्याने स्मृती ज्ञानेश्वर पाटील (50), हरीश सुभाष पाटील (24), संतोष ज्ञानेश्वर पाटील (वय 26) आणि योगेश ज्ञानेश्वर पाटील (वय 23) यांना 1 वाजता भगवानने मारहाण केली. यातील स्मृती पाटील या आजीबार्इंची प्रकृती गंभीर असून, त्यांचा हात व मानेवर वार केले आहेत. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात सुरेश कोळी व संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
भगवानसह त्याने हल्ला केलेल्या जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथेही त्याने पोलिसांना शिव्या देण्यास सुरुवात केली. मनसेचे नगरसेवक संतोष पाटील यांनाही त्याने पोलिसांसमोरच शिव्या दिल्या. तशाच अवस्थेत पोलिसांनी भगवानला पोलिस ठाण्यात हलवले. त्याला रुग्णालयातून बाहेर काढत असताना संतोष पाटील यांच्या समर्थकांनी भगवानवर हल्ला चढवला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करीत भगवानला पोलिस ठाण्यात सुखरूप पोहोचवले. भगवान पोलिसांसमोरच सर्वांना शिव्या देत होता. त्यामुळे संतोष पाटील यांच्यासह समर्थकांनीही पोलिसांच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत तक्रार करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. मात्र, पोलिस अधीक्षक नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.
एमपीडीएतून मुक्त
गेल्या वर्षी पोलिसांनी भगवान हटकर याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्याला नाशिक जेलमध्ये पाठवले होते. तेथे शिक्षा भोगत असताना हटकरने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वीच त्याची मुक्तता केली आहे. त्याच्यावर 10पेक्षा जास्त गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

डीवायएसपींनी दिले गुन्हा दाखलचे आदेश
दरम्यान, हा गोंधळ सुरू असताना पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केली. चौकशीअंती त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रात्री 8.30 वाजता बच्छाव यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
फोटो - जिल्हा रुग्णालयात भगवान हटकर याने नगरसेवक संतोष पाटील यांना शिवीगाळ केल्यामुळे संतप्त झालेले कार्यकर्ते. हटकर याने मारहाण केल्यामुळे जखमी झालेल्या स्मृतीबाई पाटील.